शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढविणार

0
212

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षांच्या हलचालींना सध्या वेग आला आहे. यादरम्यान लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष २३ जागा लढवेल. आम्ही याबाबत दिल्लीतील काँग्रेस हायकमांडसोबत त्याबद्दल चर्चा होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

माध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नसेल. तसेच, उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलं, हे आम्हाला माहिती आहे.

महाराष्ट्रातील जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीत हायकमांडसमोर होईल, आम्ही २३ जागा लढवतोय हे आम्ही दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं आहे. आमचे संबंध दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांसोबत अत्यंत मधूर आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची आमची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, ते महाविकास आघाडीचा भाग असावेत याविषयी आमची दिल्लीत चर्चा झाली आहे, आम्ही २३ जागा लढवणार, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर संजय राऊतांचा दावा खोडला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, कोण किती जागा लढणार हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे, मेरीटवर आम्ही जागा लढवू. हा निर्णय हायकमांड घेईल. हा राज्य स्तरावरचा निर्णय नाही. हा केंद्रीय स्तरावरचा विषय आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे यासंबंधीचा निर्णय घेतात.अजून प्राथमिक चर्चेची फेरीही झाली नाही मग जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.