शिवसेना खासदारांची पक्षाच्या बैठकिकडे पाठ

0
194

– एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन बैठकिला १४ खासदारांची हजेरी

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, शिवसेनेसह तमाम राजकीय पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. पण, शिवसेनेच्या गोटात शांतता होती. शिंदे गटातील संभाव्य खासदार संसद भवनातील तिसऱ्या मजल्यावरील शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या कार्यालयाकडे फिरकले नाहीत. शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला असल्यामुळे शिवसेनेच्या खासदारांमधील फूट मतदानावेळी ‘’अधिकृत’’ होऊ शकली नाही !

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर लोकसभेतील मुख्य प्रतोदपदावरून भावना गवळी यांची हकालपट्टी करण्यात आली व त्यांच्या जागी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती केली गेली. तसे अधिकृत पत्र शिवसेनेच्या वतीने लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले आहे. हा बदल संसद भवनातील शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या कार्यालयातही झालेला दिसला. कार्यालयाच्या दर्शनी भागावरील गवळी यांच्या नावाची पाटी काढून टाकण्यात आली असून मुख्य प्रतोद म्हणून विचारे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे संसदेत मतदानासाठी आले होते. श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे जवळचे मित्र व खासदार श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे होते. लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत, खासदार सदाशिव लोखंडे यांची प्रकृती ठीक नसून अन्य सात-आठ खासदार मात्र, सोमवारी सकाळी शिवसेनेच्या कार्यालयात होते, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेच्या काही खासदारांना शिंदे गटात जायचे असेल तर, त्यांनी जावे. पण, ती त्यांची चूक ठरेल, हे त्यांना नंतर कळेल, असे राऊत म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या शक्यतेवर चर्चा होत आहे. मात्र, या संदर्भात दोन दिवसांनी विचारपूर्वक निर्णय घेऊ, असे मंडलिक यांनी पत्रकारांना सांगितले.

शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या तीन सदस्यीय घटनापीठासमोर बुधवारी महत्त्वाची सुनावणी होत आहे. या सुनावणीमध्ये शिंदे गटातील आमदार अपात्र ठरणार की, त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व कायम राहणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या निकालावर खरी शिवसेना कोणाची याचाही निकाल लागू शकेल. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांप्रमाणे खासदारांचेही सर्वोच्च न्यायालयातील निकालाकडे लक्ष लागले आहे. त्यावर शिंदे गटातील संभाव्य खासदारांचा लोकसभेत वेगळा गट होईल का, त्याला लोकसभाध्यक्ष मान्यता देतील का, असे अनेक मुद्देही निकालात निघू शकतील.