शिक्षक, पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांच्या नैतिकतेचा ऱ्हास : समाजाला धोक्याची घंटा

0
56

रोखठोक – सारंग कमतेकर

आज सकाळी कोल्हापूरमधील एका वर्तमानपत्राताचे पहिले पान समाज माध्यमाद्वारे माझ्या समोर आले. त्या वर्तमानपत्रातील पहिल्याच पानावरील चार वेगवेगळ्या बातम्या वाचून मन अत्यंत खिन्न झाले. त्या चार बातम्या होत्या :
१) करणी काढण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ७० हजारांची लूट करणाऱ्या टोळीतील सहभागी असलेल्या महिला पोलीस कर्मचारीला अटक.
२) पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांसह तीघांना रंगेहात पकडले.
३) इचलकरंजीतील एका राष्ट्रीय बँकेच्या वतीने थकीत कर्ज प्रकरणी केली जाणारी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी १.८० लाखांच्या लाच प्रकरणी बँकेच्या कायदेशीर सल्लागाराला पुण्याच्या सीबीआय लाचलुतपत प्रतिबंधक विभागाकडून अटक.
४) कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कळे गावाच्या एका शाळेतील दोघा शिक्षकांनी शिवीगाळ करत मुख्याध्यपकांच्या कार्यालयातच एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत हणामारी केली.
न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेले न्यायधीश आणि भावी पिढी घडवणारे शिक्षक जेव्हा स्वतःच अनैतिक कृत्य करत असतात, तेव्हा समाजातील मूल्यव्यवस्था धोक्यात येते. शिक्षक, पोलीस, वकील आणि न्यायाधीश, समाजातील या मुख्य घटकांच्या संबंधित या चारही बातम्या वाचून माझ्या मनात विचारांचे एक वादळच निर्माण झाले. चिंता, निराशा, राग अशा अनेक भावनांनी माझे मन ग्रासले गेले. एकीकडे पोलीस, वकील, न्यायाधीश आणि शिक्षक हे समाजातील आदरणीय मानले जाणारे घटक आहेत. मात्र, याच व्यक्तींच्या वतीने होणारे असे कृत्य समाजातील नैतिक अध:पतणाचे द्योतक आहे. या सर्व घटनांमध्ये भ्रष्टाचार आणि लालच हे प्रमुख कारण दिसून येते. अनैतिक मार्गानी पैसा कमवण्याची स्पर्धा वाढली असून, यामुळे समाजात असमानता वाढत आहे. पैशाच्या लोभामुळे लोक कोणतीही मर्यादा पार करण्यास तयार झाले आहेत. आपल्या अशा कृत्याचा परिणाम आपल्या व्यक्तिगत जीवनावर, कुटुंबावर, समाजावर आणि भावी पिढीवर काय होईल याचा विचार आता पूर्णपणे नष्ट झाला आहे.
राजकारणी, शासकीय अधिकारी / कर्मचारी, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस, मतदार, भ्रष्टाचाराने समाजातील अगदी प्रत्येक घटक पोखरला गेला आहे. कायदा, न्याय आणि सत्य या मूल्यांचे महत्त्व नष्ट होत आपल्यामध्ये स्वार्थ आणि लोभ वाढत चालला आहे. अनुशासनहीनता आणि अनैतिक कृत्यांच्या घटना सर्वच क्षेत्रात घडत असल्याने त्याबद्दलची चीड देखील आता आपल्याला येत नाही. स्वार्थापोटी समाज मुर्दाड झाला आहे. सत्य, न्याय आणि नीति यांना धुडकावून लावत भ्रष्टाचारी मंडळी आपली स्वतःची साम्राज्ये उभी करत आहेत. भ्रष्टाचाराचा विषबाण इतका पसरला आहे की, त्याचे उपचार करणे जवळपास अशक्य झाले आहे. भ्रष्टाचाराच्या या साखळीतून सुटका करणे आता आपल्यासाठी एक प्रचंड मोठे आव्हान बनले आहे. सत्ता, मान आणि पैसा मिळवण्यासाठी काहिही करण्याची मानसिकता आपल्या नसानसात भिनू लागली आहे. हे सर्व आपल्या समाजाला आणि देशाला घातक ठरत आहे.
अशा प्रकारच्या घटना नित्याच्याच घडत असल्याने नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. आपण समाज घडवण्यात कुठेतरी चुकत आहोत हे सत्य दिवसेंदिवस उघड होत आहे. शिक्षणाचा घसरलेला दर्जा, नैतिकदृष्ट्या भ्रष्ट राजकारणी, भौतिकवादी जीवनशैलीचे प्रचंड आकर्षण, दिवसेंदिवस वाढत जाणारी आर्थिक विषमता आणि पैसे कमविण्याच्या धडपडीत कुचकामी ठरत असलेले पालकत्व यामुळे सामाजिक मूल्यांचा ऱ्हास झपाट्याने होत आहे. भावी पिढी ही आजच्या पिढीच्या आदर्शांचे व कृतींचे अनुकरण करते, त्यामुळे आजच्या पिढीची अनुशासनहीनता, निष्क्रियता आणि भ्रष्ट व स्वार्थी वृत्ती आपल्या भावी पिढीला वाईट मार्गावर ढकलत आहे.
मात्र हे सर्व आपल्याला बदलायला हवे. अजूनही वेळ गेलेली नाही, आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी आणि नैतिक मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी जाणीवपूर्वक आणि जागरूक प्रयत्न करायला हवेत. आपल्या देशाची युवा पिढी बुद्धिमान आणि प्रतिभावान आहे. मात्र त्यांच्या समोर योग्य आदर्श घालून द्यायची जबाबदारी आपली आहे. यापूर्वी स्वार्थी विचाराने आणि भौतिक सुखाच्या हव्यासापोटी आपल्या प्रत्येकाच्या हातून काही चुका घडल्या आहेत, परंतु आता त्या चुका सुधारण्याची वेळ आलेली आहे. आपल्या देशाला लाभलेला नैतिक मूल्यांचा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढीला देण्याची जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून एक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. यासाठी आपल्या मनातील सद्गुणांना जागृत करून आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्याचा छोटासा प्रयत्न देखील समाजात मोठा बदल घडवू शकतो. हे सर्व एका रात्रीत घडणार नसले तरी देखील प्रत्येक व्यक्तीच्या सकारात्मक कृतीचा समाजावर सकारात्मक प्रभाव पडतो. आपली कृती ही प्रेरणा बनते आणि इतरांनाही सद्गुणांचे अनुकरण करण्यासाठी प्रेरित करते. आजपासून आपण आपल्या दैनंदिन जीवनात सत्य, निष्ठा आणि प्रामाणिकपणा यासारखे गुण रुजवून एक आदर्श समाज निर्माण करण्यात योगदान देऊया आणि समाजातली बिघडलेली घडी दुरुस्त करूया.