शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून काम केल्यास शाळांचा दर्जा उंचावेल – आयुक्त सिंह

0
211

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – शाळा आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण प्रयत्न केल्यास महापालिका शाळांचा दर्जा निश्चितपणे उंचावणार असून आधुनिक युगात विविध स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बळकटी मिळेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या शाळेतील प्राचार्य आणि शिक्षकांची क्षमता वाढीबाबत प्रशिक्षणाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे आज (सोमवारी) प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन महापालिका आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित महापालिका शाळांचे प्राचार्य आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संदीप खोत, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, आदित्य बिर्ला फाउंडेशनचे प्रदिप व्होरा, सुकृत साठे, प्रशांत साळुंखे यांच्यासह केपीएमजी सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी आदी मान्यवर तसेच महापालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. ज्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कमी आहे, जे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे आहेत, अशा विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून शहराचा नावलौकिक वाढविला आहे. तरी देखील यामध्ये सुधारणेला वाव असून महापालिका शाळांचा दर्जा अधिकाधिक वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यास सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.

शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. आकांक्षा फाउंडेशनचे मॉडेल सर्व शाळांमध्ये राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांचा सहभाग महत्वाचा आहे. शिक्षकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही देखील जबाबतदारी पार पाडायला हवी. पोषक आहारासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांशी सुसंवाद साधून त्यांना त्याबद्दल सांगणे गरजेचे आहे. महापालिका शाळांची गुणवत्ता अधिकाधिक वाढावी, यासाठी महापालिकेच्या वतीने ‘जल्लोष शिक्षणाचा’ या उपक्रमांतर्गत शाळा- शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक, कला, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळेला ‘स्कूल ऑफ द इअर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. स्कॉलरशिप प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने ‘भारतदर्शन सफर’ घडवून आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ करून महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मनापासून प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडेल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आदित्य बिर्ला फाउंडेशनचे प्रदिप होरा यांनी बदलत्या शिक्षण पध्दतींबददल शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी आई- वडीलांप्रमाणे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण ठरते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ करणे आवश्यक असून आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाचा कला अवलंब करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपआयुक्त संदीप खोत यांनी केले. सूत्रसंचालन गणेश लिंगडे तर आभार अनिता जोशी यांनी मानले.