शिक्षकांच्या बदल्यांसाठी २० कोटी गोळा केले, गेले कुठे ?

0
433

पिंपरी चिंचवडला बदल्यांसाठी भाजपने मांडला होता बाजार

राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एक पत्र लिहून लाचखोर अधिकाऱ्यांना मोठ्ठा धक्का दिला. शालेय शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांत ४० अधिकारी कोणत्या ना कोणत्या प्रकरणामध्ये लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत. या सर्वांची खुली चौकशी करा, अशी रोखठोक मागणी त्यांनी थेट लाचलुचपत विभागाला पत्रातून केली आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी अक्षरशः बाजार चालतो, फायलीवर वजन ठेवले की सोयिच्या जिल्ह्यात बदली मिळाल्याचे अनेक दाखले आहेत. शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, लेखाधिकारी अशा सर्वांचा कसा समावेश आहे त्याचे दाखले मांढरे यांनी दिलेत. ज्या अधिकाऱ्यांची सचोटी, चारित्र संशयास्पद वाटते अशा ४० अधिकाऱ्यांची नावेच त्यांनी पत्रात दिल्याने लाचखोर मंडळींची झोप उडाली. लाचखोरीत सापडलेले नंतर निर्दोष सिध्द झाले की पुन्हा सेवेत रूजू होतात आणि तेच काम करतात, असेही त्यांनी पत्रातून निदर्शनास आणले. खरे तर, तमाम जनतेने सुरज मांढरे यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे. कारण शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र किती गढूळले आहे त्याचे दर्शन त्यांनी घडवले.पाठोपाठ शांत न बसता स्वच्छता मोहिम सुरू केली. जे पत्र मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अर्थात एसीबी विभागाला दिले त्यातील एकन् एक शब्द पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाला लागू पडतो. महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आली त्यावेळी एका भाजप नेत्याच्या कार्यकर्त्याने शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी अक्षरशः दुकान उघडले होते. त्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरणाची तरतूद वापरली. पती महापालिका शाळेत असेल आणि पत्नी जिल्हा परिषदेत शिक्षक असेल तर त्यांना एकाच ठिकाणी म्हणजे महापालिकेत बदली करण्याचा नियम आहे. अशा गरजू २६० शिक्षकांकडून प्रत्येकी ७ ते ८ लाख रुपये प्रमाणे रोख २० कोटी रुपये जमा केले. आजवर त्यांच्या बदल्या नाहीत आणि पैसेपण नाहीत. सरळ सरळ धूळफेक आहे. बिच्चारे शिक्षक चरफडले आणि भाजप नेत्यांना लाखोल्या वाहून शांत झाले. प्रेसकडे जाण्याची धमकी देणाऱ्यांची थोडेफार पैसे मिळाले. आमचे पैसे द्या म्हणून लोकांनी भाजप नेत्याचा उंबरा झिजवला आणि वैतागून गप्प बसले.

शिक्षक भरतीसाठी ४० लाखाचा भाव, आयुक्तांचा मुलगाच…
पंधरा वर्षांपूर्वी भाई म्हणून महापालिका आयुक्त होऊन गेले. त्यांच्या काळात शिक्षक भरतीचे एक प्रकरणे गाजले. वर्तमानपत्रांतून रोज बातम्या येत होत्या. शिक्षकांनी आपल्या नातेवाईकांना नोकरी मिळावी म्हणून सुरवातील ५० हजार नंतर लाख-दोन लाख असे पैसे गोळा करून दलालाकडे दिले. पोलिसांनी तपास सुरू केला, तर थेट महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातूनच हे रॅकेट चालत होते आणि त्याचा सूत्रधार खुद्द आयुक्तांचा मुलगाच निघाल्याने सगळे चक्रावून गेले. तत्कालिन दिवंगत आमदार गजानन बाबर यांनी थेट विधानसभेत या प्रकऱणाची लक्षवेधी मांडली होती. सरकारने लेखी उत्तरातच शिक्षक भरतीत तब्बल ४० लाख रुपयांचा गोलमाल व्यवहार झाल्याची प्रांजळ कबुली दिली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी ते आयुक्त होते म्हणून त्यांची बदलीवर प्रकऱणे निभावले. हा झाला शिक्षक भरती, बदली मधील इतिहास. नंतर काही फरक पडला असेही नाही. जे कोणी शिक्षणाधिकारी आले त्यांनी तुंबड्या भरल्या. एका शिक्षणाधिकाऱ्यांने तर या काळ्या पैशातून स्पाईन रोडला पेट्रोल पंप टाकला. शिक्षण मंडळ म्हणजे चराऊ कुरण होते. ४०-५० कोटी रुपये बजेट असायचे. विद्यार्थअयांसाठी गणवेश, दप्तर, वह्या-पुस्तके, बूट मोजे, सकस आहार अशी खरेदी असायची. त्यावेळी आणि आजही पटसंख्या ५० हजार प्रमाणे सगळी खरेदी व्हायची. प्रत्यक्षात हजेरीपटावर ३५ ते ४० हजार विद्यार्थ्यी असायचे. कल्पना करा किती मोठा भ्रष्टाचार होता. किमान १५ कोटी रुपये दरवर्षी वाटप व्हायचे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांना सर्व मौजमजेसह थायलंडची ट्रीप, सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट ठेकेदार वाटत असे. पोषण आहार ठेक्यासाठी गोवा सहलीला जाऊन ललनांसंगे नंगानाच करणाऱ्या काही अधिकारी, सदस्यांचे भलतेसलते रेकॉर्डींग ठेकेदारांच्या संग्रहात आहे. त्या जोरावर त्या ठेकेदाराने किमान २५ कोटींची कामे सलग २-४ वर्षांसाठी मिळवली होती. हे किस्से एकले की एक चित्रपट तयार होईल. आजही अगदी तसेच सुरू आहे, फक्त ते सर्व प्रशासनाच्या खिशात जाते. बदल्यांसाठी ऑनलाईची सुविधा केली आणि प्रथमच १६७ बदल्या या पध्दतीने झाल्या ही एक समाधानाची बाब. १० वीच्या निकालातील विद्यार्थी यथातथा असतात. शिक्षकांन, पर्यवेक्षक शिक्षणाधिकारी यांचे लक्ष विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यापेक्षा पैसे कसे, कुठे काढता येतील याकडे असते. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी ४० लाचखोर अधिकाऱ्यांची खुली चौकशी कऱण्याची मागणी केली, आता तशीच मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केली पाहिजे. नाशिकच्या शिक्षणाधिकाऱी सौ. धनगर यांना लाच घेताना पकडले म्हणून हे महाभारत घडले. धनगर यांच्या घरात ८० लाख रुपये रोख आणि ३२ तोळे सोने, दोन फ्लॅट, दुकान, प्लॉट अशी गुंतवणूक सापडली. तमाम जनतेचे डोळे पांढरे झाले आणि सुरज मांढरे जागे झाले. सरस्वतीच्या मंदिरात लक्ष्मीची दादागीरी आहे. एकतर सरकारने शिक्षणाचाच व्यापार मांडल्याने गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण कठिण झाले. वर्षाला दोन – तीन लाख रुपये बालवाडीसाठी फी घेणाऱ्या शाळा पाहिल्यावर सरकारच्या मोफत धान्यावर जगणारी ८० कोटी जनता त्यांच्या मुलांचे काय कऱणार हा प्रश्न आहे. आणि जिथे सरकारी शाळा आहेत तिथे लाचखोर झारितले शुक्राचार्य बसलेत. भावी पिढी बरबाद करायचे काम करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. आयुक्त साहेब, पिंपरी चिंचवडमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी ४ वर्षांपूर्वी २० कोटी कोणी गोळा केले, कुठे गेले जरा माहिती घ्या आणि धमक असेल तर प्रकरण लाचलुचपतकडे पाठवा. महिन्याला एक लाचखोर या महापालिकेत सापडतोय याचा अर्थ हा बाजार किती मोठा आहे ते जनता जाणते.