शिंदे गटाविरोधातील विविध याचिकांवर उद्या घटनापीठापुढे सुनावणी

0
330

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर उद्या घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेनेला पुरावे सादर करण्यासाठी दिलेली वेळ देखील उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्याच शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्यात यावी यासोबतच अन्य मागण्यांसंदर्भात शिवसेनेच्या वतीने विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे वर्ग केले आहे. या याचिकांवर आता घटनापीठासमोर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आमच्याकडे 40 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असून, आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे देखील दाद मागण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेला देण्यात आलेली मुदत उद्या संपणार असल्यानं शिवसेनेच्या वतीने उद्याच निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाविरोधात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी. राज्यपालांनी एकनाथ थिंदे यांना दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, शिंदे, फडणवीस सरकारने जिंकलेला विश्वासदर्शक ठराव अशा विविध याचिकांचा यामध्ये समावेश आहे. त्यावर उद्या घटनापीठापुढे सुनावणी होण्याची शक्याता आहे.