शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी क्लिन चिट

0
217

– आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट सादर, मनी लॉन्ड्रींग च्या गुन्ह्यात ईडी काय भूमिका घेणार याकडे लक्ष

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारणे हा आमदार सरनाईक यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कारण ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत त्याची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश पण देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याच प्रकरणाच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी केली होती.

काय आहे प्रकरण?
साल 2014 एमएमआरडीएला 350 ते 500 सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुप या कंपनीला मिळालं होतं. मात्र या सुरक्षा रक्षक कंत्राटबाबत गैरप्रकार झाला आणि त्याचा आर्थिक फायदा प्रताप सरनाईक आणि अमित चांदोले यांनी घेतला, अशी तक्रार कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानं केली होती. या कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याच्या आरोप ठेऊन मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत टॉप्स ग्रुपच्या माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. तर ईडीनं आमदार सरनाईक यांच्या घरावर तसेच कार्यालयात धाडी टाकून कुटुंबियांची चौकशी यापूर्वीच केली आहे. यात सरनाईकांचे निकटवर्तीय अमित चांदोले यांनाही ईडीनं अटक केली आहे.