शाईफेक प्रकरण आता महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत

0
318

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.दरम्यान या प्रकरणावर विविध स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते अनेकदा विविध विषयांवर भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी भाष्य केले आहे. त्यांनी फेसबुकवर अप्रत्यक्षरित्या पोस्ट करत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
“थोडक्यात महत्वाचे… बोटाला शाई लावण्याच्या वेळी सावध आणि विचार पूर्वक कृती केली पाहिजे”, अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी केली आहे. यात त्यांना कोणाचेही नाव घेता अप्रत्यक्षरित्या पोस्ट केली आहे.
सचिन गोस्वामी यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “बरोबर, नाही तर तोंडावर शाई फेकन्याची वेळ येते”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने “शाई लावणाऱ्याला अक्कल पाहिजे ना सर तेवढी…!” असे म्हटले आहे.

नेमकी घटना काय?
चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला. पाटील हे चिंचवड गाव येथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.

चंद्रकांत पाटील यांचं ते विधान काय?
पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत,” असं पाटील म्हणाले.