शहरांच्या विस्तारासोबतच नवीन तंत्रज्ञानाची जोड धरून विकासाला सामोरे जावे लागणार

0
226

पिंपरी, दि.७ (पीसीबी) – देश स्वातंत्र्यानंतर मोठया वस्त्यांचे शहरांमध्ये रुपांतर झाले. यामुळे शहरीकरणात मोठी भर पडली. शहरांच्या गरजा वाढून पाण्याची व्यवस्था, ड्रेनेज, रस्ते, वाहतुक समस्या तसेच शहरांचे आरोग्य, पर्यावरण संवर्धन अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरांच्या विस्तारासोबतच नवीन तंत्रज्ञानाची जोड धरून विकासाला सामोरे जावे लागणार आहे, याचा समतोल साधण्यासाठी शहरी नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये स्टार्टअपच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहे, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी केले.

ऑटोक्लस्टर येथे आयोजित “फेस्टीवल ऑफ स्टार्टअप”च्या दुस-या दिवशी ‘कॅटलायझिंग ग्रोथ: उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधांची भूमिका’ या विषयावरील पॅनेल चर्चेवेळी उपस्थित नवउद्योजकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पीएमआरडीएचे संचालक राहुल महिवाल (आयएएस), पीएमपीएमएलचे संचालक सचिंद्र सिंग (आयएएस), पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह (आयएएस), पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते (आयएएस), पॅनल चर्चेसाठी सहभाग नोंदविला. यावेळी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, उपायुक्त रविकिरण घोडके, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, फॉक्सबेरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित भार्गव, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, व्यवस्थापक उदय देव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, श्री बालाजी युनिर्व्हसिटी, एसबी पाटील इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट, एमयुसीसी कॉलेज पिंपरी, डीवाय पाटील इन्स्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजी, संगवी केशरी कॉलेज आदींनी सहभाग नोंदविला.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांची स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण होत आहे. शहरांच्या गरजेनुसार दोन्ही महानगरपालिका नियोजनावर भर देत आहे. शिक्षण, रस्ते विकास, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, पर्यावरण अशा आवश्यक घटकांच्या मजबूतीसाठी उपाययोजनांचा शोध घेवून नव्या कल्पनांच्या मांडणीसह स्टार्टअप उभे राहायला हवे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने नेहमीच सहकार्याची भावना ठेवली आहे. शहरी नियोजनात निर्माण होणा-या समस्यांवर मात देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल म्हणाले की, महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, संसाधनांचे सुधारित नियोजन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी “जीआयएस” प्रणाली विकसीत आहे. मालमत्तांच्या सर्वेसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरत असून याचा वापर अधिक प्रभावीपणे होण्यासाठी स्टार्टअपने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगत फेस्टीव्हल ऑफ स्टार्टअपच्या माध्यमातून अशा अनेक कल्पना विकसीत होतील, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र सिंग आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी संजय कोलते यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. नागरी स्थलांतरामुळे पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. लोकसंख्येच्या वाढीबरोबर शहराच्या अनेक गरजा निर्माण झाल्या आहेत. या समस्यावर उपाय शोधण्यासाठी आमचे तरुण सक्षम असून स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक उपाययोजना पुढे येतील. कर आकारणी, पर्यावरण, वाहतूक व्यवस्थापन, डेटा ॲनालिटिक्स आणि मालमत्ता कर समस्या तसेच इतर संसाधन क्षेत्रात शहरी नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये स्टार्टअपच्या भूमिकेबद्दल चर्चा करण्यात आली. दुपारच्या सत्रात महेश कुलकर्णी माजी सीएफओ, एंजल इन्व्हेस्टर, स्टार्टअप मेंटॉर), मनोज मिश्रा (संचालक – फिनान्झा होल्डिंग पीटीई लिमिटेड, सिंगापूर) यांचे मार्गदर्शन लाभले. स्टार्टअप महोत्सवासाठी स्टार इंजिनियर्स, बँक ऑफ बडोदा, श्री बालाजी विद्यापीठ पुणे, शिर्के कन्स्ट्रक्शन्स, एल & टी आणि ब्रदर्स इन्स्टिट्यूट यांनी इनक्युबेशन पार्टनर म्हणून प्रायोजित केला आहे. कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी, ऑटो क्लस्टर, इन्क्युबेशन सेंटर व स्मार्ट सारथी टीम यांच्या वतीने करण्यात आले.