शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडासह चौघांना अटक

0
386

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी रावेत, पिंपरी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन कारवाया केल्या असून त्यात चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एकजण तडीपार केलेला गुंड आहे. तिन्ही कारवायांमध्ये दोन पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, एक कोयता आणि एक तलवार अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.

अजय अरुण गायकवाड (वय २३, म्हाळुंगे, पुणे) याला पोलिसांनी ३१ मे २०२२ रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. त्याने त्याचा साथीदार संभाजी मोहन यमुनवाड (वय २१, रा. म्हाळुंगे, पुणे) याच्यासोबत मिळून दोन पिस्टल, पाच जिवंत काडतुसे अशी शस्त्रे बाळगली. याबाबत सोमवारी (दि. १८) रात्री रावेत येथे कारवाई करून रावेत पोलिसांनी दोघांना अटक केली. दुचाकीसह ९३ हजार ३५० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

राजेश रामगोपाल यादव (वय २३, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने कोयता सदृश्य हत्यार जवळ बाळगल्याने त्याच्यावर मंगळवारी (दि. १९) सायंकाळी कारवाई करून १०० रुपये किमतीचे कोयता सदृश्य हत्यार जप्त करण्यात आले आहे.

शस्त्र विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघिरे (वय २३, रा. कस्पटेवस्ती, वाकड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५०० रुपये किमतीची एक तलवार जप्त केली आहे.