शनिशिंगणापूर मध्ये महिलांनाही चौथऱ्यावर अभिषेकाची परवानगी, पण…

0
350

महाराष्ट्र,दि.१९(पीसीबी) – अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे रोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यापूर्वी येथील शनि चौथऱ्यावर जाऊन पुरुष व महिला भाविकांनाही तेल अभिषेक करता येत होता. मात्र, नंतर महिलांना शनि चौथऱ्यावर प्रवेश बंदी करण्यात आली होती.

दरम्यान, 2014 मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिलांनाही शनि चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्याची परवानगी मिळावी, यासाठी जोरदार आंदोलन केलं. त्याची दखल घेत, देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी सगळ्याच भाविकांना केवळ पादुकापर्यंत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.

28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने हा नियम मोडला व चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक केला. 400 वर्षांची परंपरा मोडल्याचा ठपका ठेवून त्यावेळी 7 सुरक्षारक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच वेळी दुसरीकडे अनेकांनी शनि चौथऱ्यावर जाणाऱ्या या महिलेचे स्वागतही केले होते.

आता श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर येथील शनि चौथरा सर्व भाविकांसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आला आहे. तेल अभिषेक करण्यासाठी महिला भाविकांनाही शनि चौथऱ्यावर प्रवेश देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थान विश्वस्त मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

विश्वस्त मंडळाने निर्णय घेतल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणीही सुरु झाली.. त्यानंतर अनेक महिला भाविकांनीही शनि चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली. या निर्णयामुळे देशभरातील लाखो भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

विश्वस्त मंडळाच्या निर्णयानुसार, शनिवारपासून भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शनि चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी भाविकांना श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 500 रुपयांची देणगी पावती फाडावी लागणार आहे. तेल अभिषेकासाठी पुरुषांसह आता महिलांनाही प्रवेश दिला जाणार असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले..