शंकर जगताप यांना भाजपची उमेदवारी

0
578

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून, भारतीय जनता पार्टीकडून चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांची उमदेवारी निश्चित करण्यात आली आहे. भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागण्याची सूचनाही प्रदेशपातळीवर करण्यात आली आहे. अद्याप याबाबत पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र उमेदवारीचा घोळ वाढत चालल्याने जगताप कुटुंबियांतून भाऊंंच्या पत्नी आश्विनी यांना डावलून अखेर शंकर जगताप यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या १५ दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. २७ फेब्रुवारीला मतदान, तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे. चिंचवडमध्ये ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत. तर ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ महिला आणि ३५ इतर मतदार आहेत. हेच मतदार आता चिंचवडचा नवीन आमदार ठरविणार आहेत.

पोटनिवडणुकीची घोषणा होताच महाविकास आघाडीतील इच्छुकांनी दंड थोपाटले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी. याकरिता प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीतून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जगताप कुटुंबियांमध्ये दोन गट नाहीत…
दुसरीकडे, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली. तर त्यांना सहानुभूती मिळेल. त्यांना उमेदवारी दिल्यास विरोधकही माघार घेवू शकतात. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल. त्यासाठी त्यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी एक गट आग्रही आहे, असा दावा केला जात आहे. तसेच, दुसऱ्या गटाकडून शंकर जगताप यांच्या उमेदवारीबाबत आग्रह धरला जात आहे. त्यामुळे भाजपात दोन गट निर्माण झाले आहेत, अशी चर्चा आहे. मात्र, भाजपात असा कोणताही गट-तट नाही. शंकर जगताप हेच भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्या माध्यमातून निवडणूक झालीच, तर विजयश्री खेचून आणणार आहोत, असा निर्धार भाजपाच्या गोपनीय बैठकीत झाला आहे, असेही सूत्रांकडून समजले.