‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कार्यालयांसाठी कचरा डेपोतील जुन्या बांधकामावर हातोडा

0
411

मोशी, दि. १७ (पीसीबी) – मोशी कचरा डेपोत उभारण्यात येणाऱ्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी प्रशासकीय कार्यालय, जलशुद्धीकरण केंद्र, विद्युत यार्ड आदी कामे करण्यात येणार आहेत. मात्र, या नवीन बांधकामांसाठी कचरा डेपोतील कंपोस्टींग रोड, स्टोअर रूम, मजुरांचे विश्रामगृह, प्रयोगशाळा ही जुनी बांधकामे पाडण्यात येणार आहेत.

पिपरी-चिंचवड शहरातील घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प मोशी येथे डीबीओटी तत्वार उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाकरिता ठेकेदाराला मोशी कचरा डेपोची जागा 21 वर्षे कालावधीसाठी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 208 कोटी 36 लाख रुपये एवढी आहे. महापालिकेचे आर्थिक अनुदान म्हणून 50 कोटी रुपये प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर ठेकेदाराला देण्यात येणार आहेत. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ठेकेदाराने विद्युत मंडळास विकावी अथवा महापालिकेला देण्याची तयारी असल्यास त्यासाठी पाच रुपये प्रतियुनिट दराने महापालिकेस उपलब्ध करून द्यावी, असे ठरविले आहे.

या प्रकल्पाच्या कामास 11 नोव्हेंबर 2019 रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली. तसेच बांधकाम सुरु करण्याचा दाखलाही देण्यात आला आहे. मंजूर बांधकाम परवानगी नकाशाप्रमाणे प्रकल्पाचे प्रशासकीय कार्यालय, जलशुद्धीकरण केंद्र, विद्युत यार्ड आदी कामांची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी जुने कंपोस्टींग शेड, स्टोअर रूम, मजुरांसाठी विश्रामगृह, प्रयोगशाळा अस्तित्वात आहे. मात्र, नवीन बांधकामे करण्यात येणार असल्याने जुनी बांधकामे पाडावी लागणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम परवानगीनुसार, ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी नवीन प्रशासकीय कार्यालय उभारणे आणि इतर सुविधा तयार करण्यासाठी जुनी बांधकामे पाडण्यात येणार आहेत.  महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रस्तावास मान्यता दिली.