विमा घोटाळ्याप्रकरणी सत्यपाल मलिक सीबीआयच्या चौकशीत

0
268

दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – जम्मू-काश्मिरमधील पुलवामा अतिरेकी हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणारे भाजपा नेते आणि माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने समन्स धाडलं आहे. सरकारी कर्मचारी समूह वैद्यकीय विमा घोटाळा प्रकरणात त्यांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. याबाबतची माहिती खुद्द मलिक यांनी माध्यमांना दिली आहे. द वायरचे पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत काश्मिरचे माजी राज्यपाल यांनी पुलवामातील अतिरेकी हल्ल्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर सत्यपाल मलिक यांनी खळबळजनक आरोप केले होते.

सरकारी कर्मचारी वैद्यकीय विमा घोटाळा प्रकरणात सीबीआयने माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना समन्स पाठवलं असून २७ किंवा २९ एप्रिलला त्यांची दिल्लीत चौकशी केली जाणार आहे. सीबीआयच्या चौकशीला सामोरं जाणार असल्याचं सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. सीबीआयने सरकारी कर्मचारी वैद्यकीय विमा घोटाळा प्रकरणातील काही स्पष्टीकरणासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावलं आहे. राजस्थानचा नियोजित दौरा असल्यामुळं २७ किंवा २९ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं सीबीआयला कळवल्याचं सत्यपाल मलिक यांनी सांगितलं आहे.

भाजपाचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल असताना राज्यातील विमा योजनेचे कंत्राट आणि जलविद्युत प्रकल्पातील कामांत २२०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन ठिकाणी आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर सीबीआयने एकदा चौकशीही केली होती. त्यानंतर आता सीबीआयने सत्यपाल मलिक यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.