मुंबई, दि. १ (पीसीबी) : जवळपास दहा दिवसांच्या हायव्होल्टेज राजकीय ड्राम्यानंतर अखेर शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपनं राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्ती होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद भाजपकडे असणार असून त्यासाठी पक्षानं आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी नार्वेकरांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार, महाराष्ट्र विधीमंडळाचं ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान, २ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर ३ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यानंतर ४ जुलै रोजी बहुमत चाचणी पार पडेल.
दरम्यान, भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. विखे हे काँग्रेसमधून भाजपत दाखल झाले आहेत. या उमेदवारीद्वारे त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं, अशी चर्चा होती. शिवसेना बंडखोर गटाकडून दीपक केसरकर यांचे नाव या पदासाठी चर्चेत आले होते. सत्ताधारी पक्षाकडून दोन उमेदवारांची नावे पुढे आल्याने सरकारमध्ये कुरबूर असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यावर एकमत झाले आणि दोन्ही नावे बाजुला ठेवत राहुल नार्वेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले.
राहुल नार्वेकर हे सुरवातील २०१४ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. तिथे पराभव झाल्यावर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०१९ मध्ये त्यांनी पक्षांतर केले आणि भाजपातर्फे कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी केली आणि जिंकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत.