विद्यार्थ्यांना “अवयव दान” विषयावर मार्गदर्शन

0
366

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटी व अखिल भारतीय भूलतज्ञ संघटना (सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट) पिंपरी चिंचवड शाखेच्यावतीने डॉ. डी. वाय. पाटील ए. सी. एस. कॉलेज, आकुर्डी येथे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे प्राण कसे वाचवायचे आणि “अवयव दान” या विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

आरोग्य जनजागृती कार्यक्रमातंर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत हृदयविकाराचा झटका, शॉक, अपघात इ. मार्गदर्शक तत्त्वांनुसार सीपीआर / सीओएलएस कार्यक्रम घेण्यात आले. तसेच, यामध्ये, वायसीएम रुग्णालयाचे उपअधीक्षक तथा भूलतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला अंदुरकर, डॉ. निलम कदम , डॉ. मनीषा सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांना “अवयव दान” या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन वामन, विज्ञान विद्याशाखा प्रभारी डॉ. मुकेश तिवारी, वाणिज्य विद्याशाखा प्रभारी डॉ. विजय गाडे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. सतीश ठाकर, मनपा अधिकारी व स्मार्ट सिटीचे प्रतिनिधी बिनीश सुरंदरन, जस्टीन मॅथ्थेव्ह, किरण लवटे यांचेसह शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सहभागी विद्यार्थ्यांना मॅनेक्विनवर प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक नागरिकाला जीवनरक्षक हेच ध्येय समोर ठेवून ऍनेस्थेसियोलॉजिस्टद्वारे सामान्य नागरिकांसाठी जागरूकता कार्यक्रम विनामूल्य घेण्यात येतो. प्रत्येक नागरिक जीवन वाचवू शकतो. या उददेश्याने सोसायटी ऑफ अॅनेस्थेसियोलॉजिस्ट पिंपरी चिंचवड (एसएपीसी) इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेसियोलॉजिस्ट (ISA) यांच्या संयुक्त विद्यमाने COLS (कंप्रेशन ओन्ली लाईफ सपोर्ट) जनजागृती करण्यात येत आहे.

शाळेत/कॉलेज/ सोसायटी/ कंपनीमध्ये मध्ये अश्या पद्धतीचे जनजागृती कार्यक्रम घेण्यासाठी सोबत दिलेल्या https://bit.ly/CPRWorkshopReg ‍ लिंकवर नावनोंदणी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.