विदेशात साखर निर्यात करण्याच्या बहाण्याने व्यापारी महिलेची सव्वा कोटींची फसवणूक

0
291

निगडी,दि.२१(पीसीबी)-विदेशात साखर निर्यात करण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यापारी महिलेची एक कोटी 29 लाख 99 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. ही घटना मे 2021 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडली.याप्रकरणी व्यापारी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेकब जॉर्ज (वय 63, रा. दिल्ली), सतनाम सिंग (वय 58, रा. पंजाब) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विदेशात आयात निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात साखर हवी असल्याचे फिर्यादींनी आरोपी जेकब याला सांगितले. जेकब याने त्याचा मित्र सतनाम हा पंजाब मधून विदेशात साखर निर्यात करत असल्याचे सांगितले. फिर्यादींनी आरोपींकडून दोन हजार 600 टन साखरेचे कोटेशन मागितले. आरोपीने दोन हजार 600 टन साखरेचे 11 लाख 96 हजार अमेरिकन डॉलर (आठ कोटी 99 लाख 99 हजार रुपये) एवढे कोटेशन दिले.

त्या रकमेच्या 20 टक्के रक्कम म्हणजेच एक कोटी 79 लाख 99 हजार 800 रुपये आरोपी सतनाम याच्या पासकॉन ऍग्रो या कंपनीला द्यावे लागतील, असे ठरले. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपीच्या कंपनीला एक कोटी 70 लाख 99 हजार 800 रुपये पाठवले. मात्र फिर्यादी यांना दिलेल्या मुदतीत साखर पाठवली नाही. त्याबाबत फिर्यादींनी आरोपींकडे विचारणा केली असता आरोपींनी 50 लाख रुपये फिर्यादीला परत दिले. उर्वरित एक कोटी 29 लाख 99 हजार 800 रुपयांचा अपहार करत फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.