विजयाला गुलाल उधळणार: संजोग वाघेरे

0
167

उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना दुचाकी रॅली व संपूर्ण पदयात्रेत निष्ठावंत शिवसैनिकांचा “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”अशा घोषणा देत उत्साह संचारत होता. तर, “स्वाभीमानी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, उध्दव ठाकरे… उध्दव ठाकरे…” अशा घोषणांमधून खरी शिवसेना एकच असल्याचे चित्र शिवसैनिकांनी पदयात्रेतूनच दाखवून दिले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, “देशाची लोकसभा निवडणूक सर्वार्थाने महत्त्वपूर्ण आहे. जनहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणा-या, देशातील जनतेची फसवणूक करणा-या प्रवृत्तीविरुध्द ही निवडणूक होत आहे. महागाई, बेरोजगारीविरुध्द आणि दडपशाहीच्या राजकारणाविरोधात निर्णय घेण्यासाठी मतदार तयार आहेत. पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघात गद्दारी गाडली जाईल‌ आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय होईल. स्वाभीमानी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळचा गड कायम राखणार आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता विजयाला गुलाल उधळणार आहे”.

संजोग वाघेरे पाटील हे अर्ज दाखल करायला निघण्यापूर्वी पिंपरीगाव येथील त्यांच्या निवासस्थानी वाघेरे यांना पत्नी उषाताई वाघेरे पाटील यांच्यासह महिला वर्गाने त्यांचे औक्षण करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसले, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, परिवारातील सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कुटुंबातील सदस्यांसह ज्येष्ठ-श्रेष्ठ सर्व ग्रामस्थांनी संजोग वाघेरेंच्या विजयासाठी पाठिशी उभा राहण्याचे आशिर्वाद दिले.

“तोच वसा आणि वारसा” घेऊन वाटचाल…

अर्ज दाखल करायला जाताना संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांचे वडील दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या पिंपरीतील पुतळ्यास अभिवादन करून आशिर्वाद घेतले. पिंपरीगावचे सरपंच ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर असा राजकीय प्रवास, तसेच जनमाणसात मिसळणारे व्य़क्तीमत्व म्हणून कार्याचा, कर्तृत्वाचा वेगळा ठसा त्यांनी शहराच्या राजकारणावर उमटवला होता. त्यांचे आशिर्वाद घेऊन तोच नम्र स्वभावाचा आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा संजोग वाघेरे पाटील चालवत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.