मुंबई,दि.०३(पीसीबी) – गुजरातची सेवा करण्यासाठीच महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करायचं ठरवलं आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान जयंत पाटील यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. कार्तिकी एकादशीच्या पूजेच्या निमित्ताने फडणवीस पंढरपुरात असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
”महाराष्ट्रात सुशिक्षित तरुणांची मोठी निराशा झाली आहे. फॉक्सकॉन महाराष्ट्रात आला असता तर किमान तीन ते चार लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. टाटांचा विमान बनवण्याचा प्रकल्पही गुजरातला गेला. याचा अर्थ जाहीर आहे की या सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करायचं ठरवलं आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरातची सेवा करायला सरकार निर्माण करण्याचं कट-कारस्थान महाराष्ट्रात झालं”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
“एकमेकाला पाण्यात पाहणारे, विरोध करणारे, ज्याचे विचार कधीच पटले नाहीत, विचारधारा एक नाही ते आमच्याविरोधात एकत्र येत असतात. ते एकत्र येतील तेव्हा आम्ही त्यांचा सामना करु,” असं फडणवीसांनी सांगितलं.
“पंतप्रधानांनी २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले असून, त्यातील काही सुरु झाले आहेत. निवडणुका आल्यावर ढोंगं करणारे, सोंगं घेणार आम्ही नाही. आम्ही पाचही वर्षं काम करणारे आहेत,” असं उत्तर त्यांनी शिवसेनेच्या टीकेला दिलं. महाराष्ट्रासाठी प्रकल्प मंजूर होत असल्याने निवडणुका लवकरत जाहीर होतील असं शिवसेनेने म्हटलं आहे.