विकसित भारत संकल्प यात्रा शहरभर

0
310

पिंपरी, दि. ५ (पीसीबी):- भारत सरकारच्या महत्वाकांशी योजनांचे लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ पिंपरी चिंचवड शहरात २८ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. आज सदर यात्रेचे वाहन पवनानगर येथील बॅडमिंटन हॉल आणि केशवनगर येथील मोरया ग्राऊंड येथे आले असता स्थानिक नागरिकांनी वाहनाला भेट देऊन शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेतला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या विविध कक्षांना भेट देऊन तेथील योजनांची माहिती घेतली.

विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमाद्वारे आधार केंद्र, आत्मनिर्भर स्वनिधी योजना,आयुष्मान कार्ड, महिला व बाल-कल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरातील ६४ ठिकाणी हे वाहन भेट देणार आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये २ ठिकाणी या वाहनासह नागरिकांना मार्गदर्शन करणारे विविध कक्ष केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या वाहनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ शहरवासीयांनी घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.