वर्षाच्या पहिल्याच दिवशी ३० वाहनांची तोडफोड

0
311

– वाकड, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

वाकड, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात नवीन वर्षाची सुरुवात वाहनांच्या तोडफोडीने झाली. रिक्षातून आलेल्या टोळक्याने रहाटणी येथे २० ते २५ आणि पिंपळे सौदागर येथे पाच वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. १) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाकड आणि सांगवी पोलीस ठाण्यात एकाच टोळक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुनील यशवंत वाघमारे (वय ५०, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी मध्यरात्री दोन वाजता एक टोळके रिक्षातून आले. टोळक्याने सुनील वाघमारे, भैय्यासाहेब जगधने, भारत सोनावणे यांच्या रिक्षांच्या काचांवर सिमेंटचे गट्टू मारून नुकसान केले. मोठमोठ्याने शिवीगाळ करत, जर कोणी मध्ये आले तर दगडाने मारून जीव घेऊ, अशी परिसरातील नागरिकांना धमकी दिली. हे टोळके महात्मा फुले कॉलनी मधून गोडांबे चौक, नखाते चौक, नखाते वस्ती येथे जाऊन टोळक्याने २० ते २५ तीनचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले.

करण दीपक उत्तमचंदानी (वय २७, रा. पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रहाटणी परिसरात तोडफोड केल्यानंतर हे टोळके पिंपळे सौदागर येथे आले. टोळक्याने चार कार, एक तीनचाकी रिक्षावर सिमेंट ब्लॉक मारून तोडफोड केली. फिर्यादी यांचा मित्र अमित घनश्यामदास सिंघानी यांना दगडाने मारून आरोपींनी जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.