वयाच्या चाळीसीनंतर केवळ शरीराचेच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे

0
287

पिंपरी, दि.१७ (पीसीबी)- भारत हा तरुणांचा देश आहे तसाच तो वयस्करांचाही देश आहे, सेवानिवृत्तांनी त्यांचे वय वाढले म्हणून नाराज होऊ नये कारण सर्वांचेच वय वाढणारआहे. वयाच्या चाळीसीनंतर केवळ शरीराचेच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे, यासाठी सेवानिवृत्तांनी नियमित आसने,योगा यासारखा व्यायाम करावा,भजन कीर्तन सोबत संगीताचा आस्वाद घेत मनमोकळे जीवन जगावे आणि पुढील प्रवास सुखकर करावे असे मार्गदर्शन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद सबनीस यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज सेवा निवृत्ती धारक दिन अर्थात “पेन्शनर्स डे” साजरा करण्यात आला होता. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सबनीस हे “सेवानिवृत्तांचे आयुष्य” या विषयावर मार्गदर्शन करत होते.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड,उप आयुक्त मनोज लोणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर, महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव तापकीर, महापालिका प्राथमिक शिक्षक संघटनेचे चंद्रकांत झगडे, महानगरपालिका प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रल्हाद गिरी गोसावी, रेल्वे संघटनेचे सुभाष मंत्री, केंद्र सरकार निवृत्ती वेतन संघटनेचे नारायण सोनार, राज्य शासकीय संघटनेचे श्रीराम मोने, जिल्हा परिषद निवृत्त संघटनेचे दिपक रांगणेकर, महिला संघटना प्रतिनिधी मंगला नायडू, प्राथमिक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम परबत गुरुजी, पदाधिकारी गणेश विपट, डी.डी. फुगे, आर.डी.गायकवाड,यशवंत चासकर, ए.पी.भावसार, कालिंदी डांगे, विजया जीवतोडे, कुमुदिनी घोडके ,शैलजा कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

आजच्या कार्यक्रमात सेवानिवृत्तांच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त केली त्यामध्ये महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी महासंघ, प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, केंद्र सरकारी कर्मचारी संघटना, पोस्ट खाते संघटना, रेल्वे कर्मचारी संघटना आणि विमा कर्मचाऱ्यांची आदी संघटनांचा समावेश होता

पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर यांनी केलेल्या प्रास्ताविकामध्ये विविध प्रश्न सादर केले, त्यामध्ये महापालिका सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्ती नंतरची निवृत्ती वेतन रक्कम,भविष्य निर्वाह निधीची रक्कम, अर्जित रजा रोखीकरणाची रक्कम मिळण्यासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी,अडचणी याबाबत खंत व्यक्त केली.दरवर्षीचा लेखा विभागात सादर करण्यात येणारा हयातीचा दाखला ऑनलाईन करावा,वयाच्या सत्तरीनंतर धन्वंतरी योजनेचा उपयोग, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वाहन लावण्यासाठी पार्किंगची सोय,सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी स्वतंत्र कक्ष याबाबत कार्यवाही करण्यासंबंधी विनंती केली तसेच संघटनेच्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात मध्यवर्ती ठिकाणी एखादी जागा मिळावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना सेवानिवृत्त संघटनांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्याबद्दल निर्णय घेतला जाईल तसेच चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दरवर्षी १७ डिसेंबर हा दिवस सेवा निवृत्ती वेतनधारक दिन या कार्यक्रमासाठी राखून ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार रामदास जाधव यांनी मानले.