वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
171

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होईल. माधवी जोशी या रायगड जिल्ह्यातील माणगावच्या आहेत. त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. वर्षभरापासून त्यांची निवडणुकीची तयारी सुरु होती. २०१९ मध्ये वंचितचे उमेदवार राजाराम पाटील यांना तब्बल ७५ हजारावर मते मिळाल्याने या वेळी वंचित कोणाला संधी देणार त्याची प्रतिक्षा होती. सोशल इंजिनिअरिंग चा भाग म्हणून जोशी यांनी संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीत मावळची जागा ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे जोशी यांनी चार दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांना तत्काळ उमेदवारी मिळाली. त्यानंतर जोशी यांनी बुधवारी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे आणि वंचितच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याबाबत विचारले असता काहीच नाही म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. तसेच बुधवारी अर्ज भरला असून गुरुवारी शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.