लोकसभा- विधानसभा एकत्रच होणार, निवडूणक आयोगाचे स्पष्ट संकेत

0
282

भंडारा, दि. १७ (पीसीबी) – देशासह राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याचा विचार सुरू आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास आमची तयारी असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले.

देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या निवडणुका एकत्र घेण्यास आयोग सज्ज आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे याला उत्तर दिले असून दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. देशपांडे हे निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी भंडाऱ्यामध्ये आले असता त्यांनी वरील माहिती दिली.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने ते आढावा घेत आहे. त्यांचा दौरा विदर्भातून सुरू झाला असून ते भंडारा येते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देशपांडे म्हणाले, कुठलीही निवडणूक ही महिनाभरात होत नाही. तयारीसाठी त्याला मोठा अवधी मिळत असतो. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेची माहिती घेण्यासाठी दौरा सुरू आहे. २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज आहे, असे देशपांडे म्हणाले.

देशपांडे म्हणाले, राज्यात मतदार यादीत तब्बल 32 लाखांपेक्षा अधिक मतदारांचे फोटो हे सारखे आहेत. येणाऱ्या निवडणुका आधी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले आहे. यादीतील बनावट मतदार ओळखून त्यांना यादीतून वगळण्यात येणार आहे असे देखील देशपांडे म्हणाले.