रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय?

0
271

मुंबई दि. १९ (पीसीबी) – साखर आयुक्तांसहीत बारामती ॲग्रो लिमीटेडची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी केली. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी तात्काळ चौकशीचे आदेश दिल्याची माहिती राम शिंदेंनी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. “इंदापूर तालुक्यामधील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो या कारखान्याने नियमाचं उल्लंघन केलं. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेली चौकशी मला मान्य नाही. म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासंदर्भात लक्ष वेधलं आहे,” असं राम शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.

“राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आताच या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मी सर्व पुरावे त्यांच्याकडे सादर केले आहेत,” असंही राम शिंदेंनी म्हटलं आहे. राज्यातील यंदाचा ऊस गाळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. तरीही इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो या कारखान्याने गाळीत सुरु केलेलं नाही असा आरोप ११ ऑक्टोबर रोजी राम शिंदेंनी केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असं राम शिंदेंनी म्हटलं होतं.

यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करावा, असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झाला आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालक आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने आदेश, १९८४ खंड चारचा भंग होतो, असे राम शिंदेंनी यापूर्वीही दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार आणि भाजपा नेते राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद सर्वज्ञात आहे. रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून भाजपाने राम शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. या कारखान्यावरून दोघांतील राजकीय वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

बारामती ॲग्रोने २२ सप्टेंबर रोजी आयुक्तालयाला पत्र पाठवून कारखाना एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याची परवनगी मागितली होती. त्या वेळीही संबंधितांना १५ ऑक्टोबरनंतर कारखाने सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते, असं या प्रकरणासंदर्भात साखर आयुक्त गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.