राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशांना जीभ कापून टाकण्याची धमकी

0
250

चेन्‍नई, दि. ८ (पीसीबी) : काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. कोणत्याही खासदारास दोन वर्षांची शिक्षा झाली तर कायद्यानुसार त्याचे सदस्यत्व लगेच संपते. त्यानुसार राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले. न्यायालयाचा आणि लोकसभेच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष देशात ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. मात्र, हे आंदोलन सुरु असतानाच काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याने राहुल गांधी याना सजा सुनावणारे न्यायाधीशांनाच थेट धमकी दिली. पोलिसांनी या धमकीची दखल घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी कर्नाटक येथे एका रॅलीत बोलताना ‘मोदी’ आडनावा संदर्भात वादग्रस्त विधान केले. मोदी आडनावाचे सगळेच चोर का असा सवाल करत त्यांनी काही दाखलेही दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला. त्यावर निकाल देताना न्यायमूर्ती एच. वर्मा यांनी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

एका खासदाराने हे भाषण दिले त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य मोठे आहे. यामुळे जनतेचा मनावर खोलवर परिणाम होत आहे. कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने हा निर्णय देताना म्हटले होते. या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी बाकी आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेस नेते सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजपही काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत आहे. देशात काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. तामिळनाडूच्या दिंडीगुल येथेही काँग्रेसच्या एससी/एसटी सेलच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बोलताना पक्षाचे जिल्हाप्रमुख मणिकंदन यांनी वादग्रस्त विधान करतानाच थेट न्यायमूर्तींनाच धमकी दिली.

जिल्हाप्रमुख मणिकंदन यांनी आपल्या भाषणात 23 मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीश एच वर्मा यांनी नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती ऐका, जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू अशी धमकीच त्यांनी दिली. त्यांच्या या वादग्रस्त भाषणाची स्थानिक पोलिसांनी नोंद घेत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास करून पुढील योग्य कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले.