राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या पुढाकाराने आणि समाजकल्याण विभाग, पुणे च्या वतीने आयोजित “शिष्यवृत्ती परिषद २०२३” संपन्न

0
285

पुणे, दि. ३१ (पीसीबी): राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या पुढाकाराने आणि समाजकल्याण विभाग, पुणे च्या वतीने पुणे येथील पुणे विद्यार्थीगृहच्या सभागृहात “शिष्यवृत्ती परिषद २०२३” संपन्न झाली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतील केंद्राचा 60 टक्के हिस्सा रक्कम महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करणे, शिष्यवृत्तीचे मिळालेले पैसे महाविद्यालयाच्या खात्यावर जमा न केलेल्या विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना, शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांकडे जमा न झाल्या अभावी विद्यार्थ्यांचे कागदपत्र अडवून न ठेवणे, एस सी / ओबीसी / व्ही जे एन टी / एसबीसी प्रवर्गातील नॉन कॅप किंवा संस्था स्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील शिष्यवृत्तीच्या कार्यपद्धती, शिष्यवृत्तीधारक मात्र अर्धवट अभ्यासक्रम सोडून जाणारे विद्यार्थी, स्वाधार शिष्यवृत्ती, महाडीबीटी पोर्टल वरील अडचणी, २०२८-१९पासून बंद झालेले फॉर्म हँडलिंग चार्जेस व त्यामधील वाढ, महाविद्यालय स्तरावरील समान संधी केंद्र, शिष्यवृत्तीसाठी आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्रातील अडचणी याबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली.

यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुले, समाजकल्याण निरीक्षक अर्चना होले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश सरचिटणीस (शिष्यवृत्ती) सुयश राऊत, पुणे विद्यार्थीगृहचे कार्यकारी अध्यक्ष सुनील रेडेकर, संचालक टी.जी.कडूसकर, प्राचार्य डॉ.तारांबळे तसेच पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते.

या शिष्यवृत्ती परिषदेबाबत माहिती देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुयश राऊत यांनी सांगितले की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश च्या संकल्पनेतून शिष्यवृत्ती परिषदेची कल्पना पुढे आली. त्या अनुषंगाने मागील वर्षी देखील वाडिया महाविद्यालय, पुणे येथे शिष्यवृत्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. “शिष्यवृत्ती परीक्षा २०२३” मध्ये उपस्थित सर्व विषयांच्या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाविद्यालय प्रशासन आणि समाजकल्याण विभाग पुणे यांच्या समन्वयातून आम्ही येणाऱ्या वर्षभर काम करणार आहोत. त्याचबरोबर इथून पुढेही दरवर्षी ही परिषद आम्ही भरवणार आहोत.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तींच्या प्रक्रिये दरम्यान विद्यार्थी आणि महाविद्यालये यांना असंख्य अडचणी येतात. त्यातून कित्येक वेळा विद्यार्थी संघटना आणि महाविद्यालये व समाजकल्याण विभाग यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. यावर मार्ग निघावा, त्याचबरोबर समाजकल्याण विभाग, महाविद्यालये आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातून शिष्यवृत्ती संदर्भातील प्रश्न, अडचणी आणि उपाययोजना, नवीन कल्पना याबाबत चर्चा व्हावी या उद्देशाने दरवर्षी शिष्यवृत्ती परिषदेचे आयोजन करण्याचे आम्ही ठरवले आहे.

सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना त्याच्या शिष्यवृत्ती संदर्भात कोणत्याही प्रकारचा मानसिक अथवा आर्थिक त्रास होऊ नये यासाठी समाज कल्याण विभाग कायमच प्रयत्नशील असतो. महाविद्यालयांनी देखील आपल्या स्तरावर पुढाकार घेत शिष्यवृत्ती संदर्भातील प्रक्रिया, कागदपत्रे, नियम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पाहिजेत. त्याचबरोबर महाविद्यालय पातळीवर येणाऱ्या अडचणी महाविद्यालयांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आम्ही अग्रक्रमाने त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. यावेळी स्वाधार शिष्यवृत्तीसाठी पुणे विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र संकेतस्थळाबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयश राऊत यांनी तर आभार रघुनाथ ढोक सर यांनी केले.