राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १४ऑगस्टला भोसरी मतदार संघातील ११ ठिकाणी रक्तदान शिबिर

0
423

पिंपरी : दि. १२ (पीसीबी) – येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यासाठी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या प्रयत्नातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून जगदंब प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने शिरूर लोकसभेच्या सर्व सहा विधानसभेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध ११ ठिकाणी रविवार (दि.१४) सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

रूपीनगर, तळवडे येथील दक्षता गणपती मंदिर, चिखली येथील विकास साने कार्यालय, मोशी येथील जय गणेश लॉन्स, नेहरूनगर येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक हॉल, दिघीतील दत्तनगर, इंद्रायणीनगर येथील संजय वाबळे यांचे संपर्क कार्यालय, सेक्टर क्रमांक २२, आंबेडकर वसाहत येथील श्रीराम भक्त हनुमान व्यायाम शाळा, यमुनानगर येथील प्रबोधनकार ठाकरे मैदान, चक्रपाणी वसाहत, पांडवनगर येथील दुर्गा माता चौक, लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालय आणि भोसरीतील दिघी रस्ता येथील विरंगुळा केंद्र या ठिकाणी शिबिर होणार आहे.

रक्तदात्यांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक रक्तदात्याचा तीन लाखांचा मोफत अपघात विमा काढला जाणार आहे. या विम्यामुळे अपघात खर्च, अपघातात जीवित हानी झाल्यास कुटुंबियांना तीन लाख रुपयांची भरपाई मिळते. देशासाठी रक्त सांडलेल्या त्या क्रांतिकारक व्यक्तींना अभिवादन म्हणून प्रत्येक तंदुरुस्त पिंपरी-चिंचवडकरांनी वरील ठिकाणी रक्तदान करावे. तीच भारत मातेला खरी वंदना ठरेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे. रक्तदान शिबिरांना खासदार कोल्हे यांंच्या समावेत मा.आमदार विलास लांडे,महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहूल भोसले,विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर भेट देणार आहेत असे ही श्री.अजित गव्हाणे यांनी सांगितले