रावेत-किवळे परिसरात होर्डिंग अंगावर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू

0
429

पिंपरी, दि. 17 (पीसीबी) रावेत-किवळे परिसरात होर्डिंग अंगावर कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. हे होर्डिंग पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावर लावण्यात आले होते. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्य जोरात सुरू आहे.

या घटनेत पाच जणांचा मृत्यू, तर तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या होर्डिंगखाली पंक्चरचे दुकान होते. त्यातील व्यक्तीचाही यात मृत्यू झाल्या असल्याची माहिती समोर येत आहेत.

शहरामध्ये आज संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांनी होर्डिंगलगत शेडखाली आडोसा घेतला. मात्र, वादळामुळे अचानक हे होर्डिंग अंगावर पडले. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती आहे.

पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग क्रेनच्या माध्यमातून होर्डिंग बाजूला करण्याचं काम सुरु आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे.