रावेतमध्ये ९८ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस; फौजदारी गुन्हा दाखल

0
220

पुणे, दि. ५ (पीसीबी) – रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीजमीटरमध्ये फेरफार करून बांधकामासाठी सुरु असलेली २ लाख ४ हजार २९२ युनिटची म्हणजे ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने नुकतीच उघडकीस आणली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, रावेत येथील रवी खिलुमन ओछानी या ग्राहकाकडील वीजमीटर व संचाची महावितरणच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये वीजमीटरमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फेरफार करून इमारतीच्या बांधकामासाठी गेल्या १८ महिन्यांमध्ये २ लाख ४ हजार २९२ युनिटची म्हणजे ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी रवी खिलुमन ओछानी विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५, १३६, १३७ व १३८ नुसार रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता अनिल कुराडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे व सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.