रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत, नाना काटे यांची आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार

0
266

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात गेली कित्येक दिवस कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

प्रसिध्दीपत्रकात ते म्हणतात, महानगरपालिकेतर्फे दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय तो पण अपुरा व कमी दाबाने, तसेच या परिसरात सोसायटी संख्या जास्त असून कमी व अपुऱ्या होणार्या पाणी पुरवठ्यामुळे सोसायटीना खासगी टॅकर मागवावे लागत आहे अश्याने सोसायटी धारकांना आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत असून लाखो रुपये कर भरून सुद्धा महानगरपालिका दैनंदिन गरज असलेला पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात करू शकत नसल्याने नागरिकांच्या दररोजच्या तक्रारींच्या रोषास लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला सामोरे जावे लागत आहे.

संबंधित विभागाचा अधिकारी व कर्मचारी यांना विचारले असता टाळाटाळ केली जाते उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे गेली एक वर्ष झाले पाण्याची टाकी बांधून तयार झालेली असून आजपर्यंत या टाकीवरून सोसायट्याना अद्यात पाणीपुरवठा चालू केलेला नाही. मार्च महिना चालू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत, उन्हाळा सुरु झालेला आहे. त्यातच दिवसाआड पाणी आणि तो ही कमी दाबाने असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत तरी मा. आयुक्त साहेब त्वरित रहाटणी पिंपळे सौदागर मधील नागरिकांची दैनदिन गरज असलेली पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी ही विनंती तशी सूचना संबंधित विभागाला देण्यात याव्या अन्यथा महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल