मोशीला नको, चिखलीतच 850 बेडचे रुग्णालय उभारा, अन्यथा…, राष्ट्रवादीचा इशारा

0
223

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीतील गायरान जागेवर उभारण्यात येणारे 850 बेडचे रुग्णालय प्रशासकीय राजवटीत मोशीत करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थळात बदल करण्याचा प्रशासलाकाला कोणी अधिकार दिला. काही राजकीय पुढारी आणि महापालिका प्रशासनाने संगनमताने चिखलीकरांच्या हक्काचे रूग्णालय मोशीला पळविल्याचा आरोप करत चिखलीतच रुग्णालय करावे. अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा विकासभाऊ साने सोशल फाऊंडेशनचे संस्थापक, राष्ट्रवादीचे युवा नेते विकास साने यांनी दिला आहे. चिखली परिसरात कामगार, सर्वसामान्य वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यामुळे या भागात रूग्णालयांची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला चिखलीतील ज्येष्ठ ग्रामस्थ सदाशिव नेवाळे, आप्पासाहेब शिंदे, विष्णू मोरे, अंकुश भांगरे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.साने म्हणाले, महापालिकेच्या वतीने चिखली येथील गायरान जमिनीवरील गट नं. 1653, 1654 याठिकाणी 850 खाटांचे रूग्णालय उभारण्यास 20 जानेवारी 2021 रोजी मंजुरी दिली. त्यासाठी जागा राखीव करण्यात आली. मात्र, वनीकरण जमिनीचे आणि जागा ताब्यात नसल्याचे सांगून हे रूग्णालय मोशीला हलविल्यामुळे चिखलीकरांमध्ये संतापाची भावना आहे. चिखलीकरांकडून पालिका करोडो रूपयांचा टॅक्‍स वसुल करते. मात्र, सुविधा देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. एकीकडे चिखलीत जलशुध्दीकरण केंद्र, संतपीठ उभारता मग चिखलीकरांच्या आरोग्यासाठी होणाऱ्या रूग्णालयाला जाणिवपूर्वक खोडा घालण्याचे, चिखलीकरांना हक्काच्या रूग्णालयापासून वंचित ठेवण्यासाठी काहींनी संगनमताने ही खेळी खेळल्याचा आरोपही साने यांनी केला.

…तर न्यायालयात जाणार
चिखलीत रूग्णालय उभारण्यासाठी 2022-23 च्या अंदाजपत्रकात 214 कोटी 74 लाख खर्च येणार होता. यासाठी 10 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, आता मोशीतील ग. नं. 646 पै. मधील आरक्षण क्रमांक 1/189 मध्ये 850 खाटांचे रूग्णालय होणार आहे. या रूग्णालयाचा खर्च 214 कोटींवरून थेट साडेचारशे कोटींवर आत्ताच गेला आहे. त्यामुळे रूग्णालय पूर्ण होईपर्यंत याचा खर्च 1 हजार कोटींवर जाईल. भ्रष्टाचारासाठीच मोशीला रूग्णालय नेल्याचा आरोप साने यांनी केला. त्यामुळे चिखलीत रूग्णालय उभारावे, अन्यथा न्यायालयात आपण दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.