मोदी शहांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यामुळे गुरूदक्षिणा म्हणून शिंदे-फडणवीस यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला दिला

0
443

वडगाव मावळ, दि. १६ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकारने तरुणांच्या हितासाठी फोक्सकोन – वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणला. मात्र आत्ताच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशाने हा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. या निर्णयाविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्या तळेगाव एम आय डी सी मध्ये हा प्रकल्प प्रस्तावातील होता, त्या वडगाव मावळ परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. या निर्णयाविरोधात वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिंदे फडणवीस सरकारचा व केंद्र सरकारचा तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आपल्या घणाघाती भाषणातून भाजपावर तुफानी हल्ला चढविला.

शिंदे आणि फडणवीस उद्योग, कंपन्या गुजरातला देऊन कशाप्रकारे मोदी-शहा यांची दलाली करत आहेत याची काही उदाहरणे वरपे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादीच देण्यात आली. त्यात बीकेसी मुंबई येथे होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, MIAL चे मुंबईत होणारे कार्यालय, पालघरची नॅशनल सेक्युरीटी गार्ड व मरीन पोलीस अकादमी, एअर इंडियाचे मुंबईतले कार्यालय, मुंबईतील शिप ब्रेकिंग उद्योग, मुंबईतला हिरे उद्योगह गुजरातला नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस यांच्या डोळ्यादेखत महाराष्ट्राची लूट चालू आहे. आणि आता शिंदे फडणवीस सरकार असताना पुण्यातील तळेगाव मध्ये होणारा फॉक्सकॉन-वेदांता हा प्रकल्पसुद्धा गुजरातला नेण्यात आला. ‘मीठ खायचे महाराष्ट्राचे आणि चाकरी करायची गुजरातची’ या पद्धतीचे हे शिंदे फडणवीस सरकार आहे, अशी टीका वरपे यांनी केली.

यावेळी मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.सुनिल आण्णा शेळके पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.प्रदीप गारटकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. गणेश खांडगे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिनजी घोटकुले, गणेशजी काकडे, भानुदासजी खळदे, मारुतीजी भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस रुपालीताई दाभाडे, विद्याताई घराडे तसेच वडगाव मावळ गावातील ग्रामस्थ, तसेच युवक, विद्यार्थी व महिला आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.