मूर्तीदान, निर्माल्यदान यशस्वी, आयुक्त शेखर सिंह यांनी करून दाखवले : थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
500

प्रशासनाने मनात आणले तर सर्व अशक्य ते शक्य होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ते करून दाखवले म्हणून तमाम गणेशभक्त, पर्यावरण प्रेमी जनतेने त्यांची पाठ थोपटली पाहिजे. कारण पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्यांमध्ये गणेशोत्सवातील सलग दहा दिवसांत एकही गणेश मूर्तीचे विसर्जित होऊ दिलेले नाही. ३० लाख लोकसंख्येच्या या शहरात सुमारे अडिच-तीन लाखावर घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. दीड दिवस, पाच दिवस, सात दिव, नऊ दिवस आणि अनंत चतुर्थी पर्यंत विसर्जन सुरूच होते. एकाही दिवशी नदी पात्रात मूर्तीचे विसर्जन झालेले नाही, असे अगदी छातीठोकपणे सांगितले पाहिजे. सलग दोन वर्षे हा उपक्रम कोणत्याही वादाशिवाय यशस्वी करून दाखवला म्हणन आयुक्तांचे आणि त्यांच्या प्रशासनाचे आभार. या उपक्रमात संस्कार प्रतिष्ठान, तनपुरे फाऊंडेशन, पोलिस मित्र संघटना, सावरकर मित्र मंडळ, टाटा मोटर्स, वाल्हेकरवाडी रोटरी क्लब, नाना काटे फाऊंडेशन अशा असंख्य स्वयंसेवी संस्था, संघटनांचे हजारो कार्यकर्ते अखंड कार्यरत होते.

सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक माजी नगरसवेकांनी त्यात सहभाग घेतला. लोकांनीही अगदी उत्फुर्त प्रतिसाद दिला आणि मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित कऱण्याचा हट्ट सोडून मूर्ती दान केल्या. २२ वर्षांपूर्वी टाटा मोटर्सचे मनुष्यबळ अधिकारी मनोहर पारळकर आणि त्यांच्या सहकार्यांनी या चळवळीचे रोपटे लावले होते, आज त्याचा वटवृक्ष झाला. आता ही परंपरा लोकमान्य झाली. कुठेही धार्मिक भावनांना ठेच न पोहचू देता महापालिका ज्या हिरिरीने यात उतरली ते सर्वात कौतुकास्पद आहे. महापालिकेच्या पर्यावरण, आरोग्य, उद्यान अशा सर्व विभागांचाही त्यात मोठा वाटा आहे.

खरोखर, मूर्तीदान आणि निर्माल्यदान चळवळ ज्या पध्दतीने शहरात रुजली त्याचे सरकारने कौतुक केले पाहिजे. आयुक्त सिंह यांनी मनावर घेतल्याने महापालिकेची सर्व यंत्रणा त्यासाठी दिवसरात्र राब राब राबली. विविध २६ घाटांवर नदी किनाऱ्यावर अगदी चोख बंदोबस्त ठेवला होता. नदी पात्राकडे म्हणजे पाण्यात कोणालाही उतरता येणार नाही यासाठी बांबुचे कठडे बांधलेले होते. पोलिसांचाही खडा पहारा होता. भक्तांच्या स्वागतासाठी मंचही उभे होते. घाटावर मूर्ती आली की तिथेच आरती आणि हौदात विसर्जन करून ती मूर्ती दान केली जात होती. शेकडो टेम्पो, ट्रकने या मूर्ती वाकड येथील दगडी खाणी पर्यत वाहून नेण्यासाठी हजारो कार्यकर्ते झटले. पुढे खाणीच्या ठिकाणी कन्व्हेअर बेल्टवर मूर्ती ठेवून त्या थेट खोल पाण्यात विसर्जित करण्याची यंत्रणा महापालिकेने उभी केली होती. अत्यंत शिस्तबध्द काम झाले कारण प्रशासनाने मनावर घेतले.

शाळा महाविद्यालयांचे युवक, लायन्स, रोटरी क्लबचे सदस्य तैनात होते. समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला. किती मूर्ती दान झाल्या हा आकडा किती मोठा आहे त्याहिपेक्षा प्रशासनाची इच्छाशक्ती महत्वाची वाटली. पाच वर्षांपूर्वी थेरगाव पात्रातले ते दृष्य आठवते आणि आजचे नितळ, स्वच्छ नदी पात्र पाहिले की कामाचे चीज झाले असे वाटते. प्लॉस्टरच्या मूर्ती त्यावेळी पात्रात टाकल्या जायच्या. त्यांची मोडतोड व्हायची. त्या तुडवतच दुसरे भक्त पात्रात त्यांच्याकडची मूर्ती विसर्जित करण्यासाठी जायचे. पाणी वाहते नसल्याने संपूर्ण पात्रात भंगलेल्या मूर्तींचा खच पडलेला असायचा. अगदी भयंकर दृष्य असायचे. संताप यायचा पण काहीच होत नसे. काही गणेश भक्तांनी दुसऱ्या दिवशी नदी पात्र स्वच्छ करण्याची मोहिम सुरू केल्याने दिलासा मिळाला होता.
दहा दिवसात घरोघरी हरळी, फुले, हार, पत्री, फळे असे निर्माल्य जमा झाले. पूर्वी ते सर्व वाहत्या पाण्यातच सोडायची प्रथा होती, आता तब्बलसुमारे १००० टन निर्माल्य गोळा केले आणि त्याचे खत केले जाणार आहे. कुठेही निर्माल्य नदीत टाकल्याचे दिसले नाही. कारण लोकांनाही हे सर्व पटले आहे. किमान गणेशोत्सवात होणारे नदिचे प्रदुषण रोखण्यात प्रशासनाला यश आले.

निर्माल्य नदीत सोडले की ते कुजते आणि किनाऱ्यावर दुर्गंधी सुटत होती. आता ते दृष्य यापुढे दिसणार नाही. लोकशिक्षण खूप महत्वाचे आहे. अनेकदा काही हिंदुत्ववादी संघटनांनी या उपक्रमाला विरोधही केला, पण नंतर लोक त्यांना साथ देत नसल्याने तोही संपला. लोकांना बरोबर घेऊन काम केले तर ते १०१ टक्का यशस्वी होते हा एक धडा आहे. नद्यांच्या प्रदुषणाबद्दल फक्त गप्पा मारणे, कागदोपत्री अहवाल तयार करणे आणि प्रत्यक्ष कृती करणे यात बरीच तफावत आहे. शहरातील सांडपाणी प्रक्रीया न करताच नदीत सोडले जाते म्हणून नदीचे गटार झाले. ज्यांच्याकडे हे काम दिले ते दरवर्षी महापालिकेला ३०-४० कोटींचा चुना लावतात. महापालिका आयुक्तांनी आता तिकडे जरा कठोरपणे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी मनात आणले तर सहा महिन्यांत नदी नितळ होईल. जशी मोहिम गणेशोत्सवात राबवली तशीच घटस्थापनेनंतर दसऱ्यालाही राबवली पाहिजे. नदीत घट विसर्जित करण्याची प्रथा आहे. प्रशासनाने मनावर घेतले तर तेसुध्दा शक्य होईल. पुन्हा एकवार आयुक्त शेखर सिंह आणि या उपक्रमात मनापासून सहभाग घेतलेल्या सर्वांना जनतेच्या वतीने धन्यवाद !!!