मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री अमित शाह यांना कशासाठी भेटले

0
254

दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल (21 सप्टेंबर) रात्री उशीरा गुप्त भेट घेतल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. काल दुपारी दिल्लीत दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा गुप्तपणे अमित शहांची भेट घेतली आहे. या गुप्त भेटीत वेदांता प्रकल्प, मुंबई महापालिका निवडणूक आणि राज्यातल्या महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही नेत्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आपल्या काही सहकाऱ्यांसह दिल्ली दौऱ्यावर होते. राज्यप्रमुखांच्या भेटीगाठीसाठी आलेल्या शिंदे यांचा अचानकपणे दिल्ली मुक्काम वाढला. रात्री साडे अकराच्या दरम्यान महाराष्ट्र सदनातून जाऊन त्यांनी ही भेट घेतलेल्याचे समजते आहे. काल रात्री दहा वाजताच ते परतनार होते. अचानक कार्यक्रमात बदल करून ते या भेटीसाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.
आजही दिवसभर शिंदे हे दिल्लीत आहेत. आजही ते महत्त्वाच्या नेत्यांची भेटी घेणार असल्याची शक्यता आहे. ज्यावेळी निवडणुक आयोगाची तारीख असते, महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची तारीख जवळ असते, अशा वेळी शिंदे यांची दिल्लीवारी आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट होत असते. याकडे राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रीया उमटत असतात. कालची भेट ही साधरण वीस ते पंचवीस मिनिटांची होती. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.