“मित्रांनो ही भावकी-गावकीची निवडणूक नाही. ही देशाच भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज एवढा मोठा आपला देश पसरलेला आहे. 135 ते 140 कोटी जनता अठरा पगड जाती इथे राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय, तरी अजून काही भाग मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत” असं अजित पवार म्हणाले. ते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. “मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मताची गरज आहे. बारामतीसाठी 7 तारखेला मतदान आहे. तीन मशीन येणार आहेत. पहिल्या मशीनमध्ये दोन नंबरला सुनेत्रा पवारांच नाव, शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटण दाबा” असं अजित पवार म्हणाले.
“वेल्हे-भोर पुण्याजवळ असूनही इथे MIDC, कारखाने नाहीत. खंडाळा तालुका सुद्धा दुष्काळी तालुका होता. आज खंडाळ्यात धरण झाल्यामुळे तिथली जमीन ओलिताखाली आली. रोजगार निर्माण झाले” असं अजित पवार म्हणाले. “काहींनी उमेदवार म्हणून येताना वल्गना केल्या की, जर आम्ही एमआयडीसी आणली नाही, तर 2019 मध्ये पुन्हा मतं मागायला येणार नाही. पण ते मतं मागायला आले. तुम्ही निवडून दिलं. भावनिक होऊ नका. तुमच्या रोजी-रोटीची ही निवडणूक आहे. पुढच भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुम्ही म्हणाल, मग अजित पवार तुम्ही काय करणार? मी माझ्या इथे काम करुन आलोय. बारामतीचा चेहरा-मोहरा बदलालय” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“मला विकास करायचा अनुभव आहे. रात्री 1 ला झोपलो, तरी 6 वाजता उठून काम करतो. मुंबई, पुणे, बारामती जिथे कुठे असेन, तिथे पाचला उठून सहाला कामाला लागतो. मला कामाची, लोकांचे प्रश्न सोडवण्याची, विकासाची आवड आहे. राज्याचं भलं करण्याचा प्रयत्न आहे” असं अजित पवार म्हणाले.
“आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही. मला निवडून द्या, एमआयडीसी झाली नाही, तर 2019 मध्ये मत मागायला येणार नाही, मग पुन्हा यायच. मी, जर त्या ठिकाणी असतो, तर मला शरमेने लाज वाटली असती. कुठल्या तोंडाने जाऊ मत मागायला. मी शब्दाचा पक्का आहे. सहजासहजी शब्द देत नाही. शब्द दिला, तर कोणाच्या बापाच ऐकत नाही, तो पूर्ण करतो. मी कामासाठी कठोर आहे. जी कामाची माणस आहेत, त्यांना आपलस करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो” असं अजित पवार म्हणाले.