पिंपरी, दि. ८ मे २०२३ (पीसीबी) – “मीच माझ्या आनंदाचा स्त्रोत आहे असे ठरवले की, जगात तुम्हाला कोणीही दु:खी करू शकत नाही!” असे प्रतिपादन समुपदेशक डॉ. राजीव नगरकर यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे रविवार दिनांक ०७ मे २०२३ रोजी केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवन’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना डॉ. राजीव नगरकर बोलत होते. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, कोषाध्यक्ष अरविंद जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. राजीव नगरकर पुढे म्हणाले की, “आपण दुसऱ्यावर हसल्याचे सहज आठवते, कधीतरी स्वतःवरही हसतो; पण स्वतःसाठी आवर्जून कधी हसलो, हे आठवून पहा. नेहमी करीत असलेल्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्यास आनंद मिळतो. अस्तू, जायते, वर्धते, विपरीण मते, अपक्षीयते, विनश्यते अशा अवस्था मानवी जीवनात असतात. परिस्थितीचा स्वीकार हा महत्त्वाचा असतो. दु:खात किंवा संकटात मीच का? असा विचार मनात येतो; पण समर्थ रामदासस्वामी म्हणतात, “जगी सर्व सुखी असा कोण आहे?…”
बहुश्रुत असणे हा आनंदी जीवनाचा पाया आहे. माणसाने बदलायला शिकले पाहिजे. मी जसा वागतो; तसा दुसरा माझ्याशी वागला तर चालेल का? असे अंतर्मुख होऊन मनाला विचारा. आनंदी राहायला सर्वांनाच आवडते; परंतु आपला आनंद दुसऱ्या व्यक्तींच्या क्रिया, प्रतिक्रिया यांवर अवलंबून असतो. जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल; तर जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करू शकत नाही. अहंकार हे आपल्या दु:खाचे मूळ आहे; तसेच स्वतःला कमी लेखणे हेदेखील दु:खाला कारणीभूत ठरते.
आपला राग वारंवार प्रदर्शित करू नका. मागितल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका. स्वतःला त्रास करून घेण्यापासून थांबवणे म्हणजे आनंदी होणे!” दैनंदिन जीवनातील साधी, सोपी उदाहरणे, ‘मनाचे श्लोक’मधील संदर्भ आणि चाणक्यनीतीतले सूत्र उद्धृत करीत डॉ. राजीव नगरकर यांनी आपल्या विषयाची मांडणी केली.
रत्नमाला खोत आणि मंगला दळवी यांनी केलेल्या त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, “‘हसाल तर जगाल!’ असे ब्रीदवाक्य आजच्या काळात हवे!” असे मत व्यक्त केले. गोपाळ भसे यांनी परिचय करून दिला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीने संयोजनात परिश्रम घेतले. राजाराम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मुरडे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली