मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

0
232
  • मतदानासाठी प्रशासनाला बोटीसह लागणार ५२५ वाहने

येत्या सोमवारी १३ मे रोजी मावळ लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार असून निवडणूक प्रशासनाची तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे. सुमारे १२ हजार मतदार अधिकारी, कर्मचारी तसेच मतदान यंत्रांच्या वाहतुकीकरिता एका बोटीसह १७५ पीएमपीएमल बसेस, २१९ एसटी महामंडळाच्या बसेस, १०५ मिनी बसेस, २५ ईव्हीएम कंटेनर लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रावर एकूण ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर ८३ सूक्ष्म निरीक्षक देखील नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानासाठी १ हजार ९५८ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट यंत्रांची आवश्यकता असून या यंत्रांची सरमिसळ करून विधानसभा निहाय त्यांचे वितरण देखील करण्यात आले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर मतदान यंत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देखील वेळोवेळी दिले जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या संपुर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ५ लाख ९१ हजार ३९८ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख १७ हजार ९६ पुरूष, २ लाख ७४ हजार २३१ महिला तर ७१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तसेच पनवेल मतदारसंघात ५४४ मतदान केंद्रे असून याठिकाणी २ हजार ४०४ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ९५८ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी ४६ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ८६ एसटी बसेस, १५ मिनी बसेस, २० जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशा १२५ वाहनांची याठिकाणी आवश्यकता असणार आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ९ हजार २०८ मतदार असून त्यामध्ये १ लाख ५५ हजार २८६ पुरूष, १ लाख ५३ हजार ९१७ महिला तर ५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३३९ मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ५०० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार २२० बॅलेट युनिट, ४६७ कंट्रोल युनिट आणि ४९१ व्हीव्हीपॅटची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी ४७ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४३ एसटी बसेस, २१ मिनी बसेस, ८ जीप, ६ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

उरण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख १९ हजार ३११ मतदार असून त्यामध्ये १ लाख ६० हजार ७०९ पुरूष, १ लाख ५८ हजार ५९३ महिला तर ९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३४४ मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ५२० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार २३८ बॅलेट युनिट, ४७४ कंट्रोल युनिट आणि ४९८ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी ६० वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४१ एसटी बसेस, २२ मिनी बसेस, २८ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर आणि १ बोट अशी ९६ वाहनांची आवश्यकता भासणार आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ७३ हजार ४०८ मतदार असून त्यामध्ये १ लाख ९१ हजार ७०२ पुरूष, १ लाख ८१ हजार ६९३ महिला तर १३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ३९० मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ७३२ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार ४०४ बॅलेट युनिट, ५५३ कंट्रोल युनिट आणि ५९२ व्हीव्हीपॅट आवश्यक आहेत. यासाठी ४५ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ४९ एसटी बसेस, २७ मिनी बसेस, २० जीप, ३ ईव्हीएम कंटेनर अशी ९९ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ लाख १८ हजार २४५ मतदार असून त्यामध्ये ३ लाख २७ हजार ९६१ पुरूष, २ लाख ९० हजार २३९ महिला तर ४५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ५४९ मतदान केंद्रे असून याठिकाणी २ हजार ४३६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ९७६ बॅलेट युनिट, ७७९ कंट्रोल युनिट आणि ८३९ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यासाठी ४८ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. १०२ पीएमपीएमएल बसेस, २० मिनी बसेस, १६ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी १४२ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३ लाख ७३ हजार ४४८ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख ९६ हजार ४३० पुरूष, १ लाख ७६ हजार ९८८ महिला तर ३० तृतीयपंथी मतदारांचा समावेश असून ४०० मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ७७६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या केंद्रांवर १ हजार ४४० बॅलेट युनिट, ५६८ कंट्रोल युनिट आणि ६०८ व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ४५ वाहतूक झोन तयार करण्यात आले आहेत. ७३ पीएमपीएमएल बसेस, १ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मतदान व मतदानोत्तर प्रक्रियेच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता पिण्याचे पाणी, औषधे, मंडप उभारणी, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था आदी सुविधांसह इतर तांत्रिक बाबींचीही पुर्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदार केंद्रांची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर असलेले क्युआर कोड स्कॅन करून मतदार यादीत आपले नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचेही दीपक सिंगला यांनी सांगितले.