मावळात ३३ उमेदवार रिंगणात, वंचितच्या जोशींना ऑटो रिक्षा चिन्ह

0
249

मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ मध्ये आज दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. वैधपणे नामनिर्दिष्ट २ उमेदवारांनी विहित मुदतीत आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ३३ उमेदवार असणार आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आज पार पडली असून निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी चिन्ह वाटप जाहीर केले.

या निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले होते. तर ३ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले होते. विहित मुदतीत २ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे उर्वरीत ३३ उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या १९० मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन तसेच लहान मुलीच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मतराव खराडे, निवडणूक सहाय्यक तथा तहसीलदार अभिजीत जगताप, मनिषा तेलभाते, सचिन मस्के यांच्यासह नामनिर्दिष्ट उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनूसार पार पडली.

• प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह :-
राजाराम नारायण पाटील (बहुजन समाज पार्टी) – हत्ती
श्रीरंग आप्पा चंदू बारणे (शिवसेना) – धनुष्यबाण
संजोग भिकू वाघेरे पाटील [शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)] – मशाल
गोविंद गंगाराम हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी) – खाट
ज्योतीश्वर विष्णु भोसले (बळीराजा पार्टी) – ऊस शेतकरी
तुषार दिगंबर लोंढे (बहुजन भारत पार्टी) – शिट्टी
पंकज प्रभाकर ओझरकर (अखिल भारतीय परिवार पार्टी) – किटली
प्रशांत रामकृष्ण भगत (भारतीय जवान किसान पार्टी) – भेटवस्तू
महेश नारायणसिंग ठाकूर (धर्मराज्य पार्टी) – बॅट
माधवीताई नरेश जोशी (वंचित बहुजन आघाडी) – ऑटोरिक्षा
यशवंत विठ्ठल पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना) – गॅस सिलेंडर
रफीक रशीद कुरेशी (देश जनहित पार्टी) – शाळेचे दप्तर
रफिक मैनुद्दीन सय्यद (आझाद समाज पार्टी) – पेनाची निब सात किरणांसह
शिवाजी किसन जाधव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) – सिंह
संतोष मगरध्वज उबाळे (भीमसेना) – जेवणाचे ताट
इंद्रजीत धर्मराज गोंड (अपक्ष) – अंगठी
मुकेश मनोहर अगरवाल (अपक्ष) – कपाट
प्रफुल्ल पंडीत भोसले (अपक्ष) – हिरा
मधुकर दामोदर थोरात (अपक्ष) – टायर
राहुल निवृत्ती मदने (अपक्ष) – ट्रक
सुहास मनोहर राणे (अपक्ष) – टॉर्च बॅटरी
मनोज भास्कर गरबडे (अपक्ष) – शिवणयंत्र
उमाकांत रामेश्वर मिश्रा (अपक्ष) – कॅमेरा
लक्ष्मण सदाशिव अढाळगे (अपक्ष) – टीव्ही
इकबाल इब्राहिम नावडेकर (अपक्ष) – जहाज
अजय हनुमंत लोंढे (अपक्ष) – नरसाळे
अॅड. राजू लालसो पाटील (अपक्ष) – सफरचंद
दादाराव किसन कांबळे (अपक्ष) – प्रेशर कुकर
चिमाजी धोंडिबा शिंदे (अपक्ष) – दुर्बिण
राजेंद्र मारूती काटे (अपक्ष) – नारळाची बाग
हजरत इमामसाहब पटेल (अपक्ष) – ड्रिल मशिन
मारूती अपराई कांबळे (अपक्ष) – तुतारी
संजोग रविंद्र पाटील (अपक्ष) – चिमणी

• उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे :-
गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी व अपक्ष)
भाऊ रामचंद्र आडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष)