मानवी चुकांची मोजावी लागलेली किंमत!***————

0
4
  • कांतीलाल कडू, पनवेल

दि. 19 (पीसीबी)घारापुरीसारख्या जगविख्यात बेटाजवळ काल पुन्हा एकदा प्रवासी वाहतुक बोटीला जलसमाधी मिळाली आणि चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर आरोपीच्या पिंजऱ्यात प्रवासी बोट चालकाला उभे केले जाणार हा कायद्याचा शिरस्ता आहे. पण, यानिमित्ताने जलप्रवासी सार्वजनिक वाहतुकीची खबरदारी घेतली जाणारी यंत्रणा कुठे पेंड खाते, याकडे फारसे कुणाचे लक्ष नाही, हे महत्वाचे कारण आहे आणि म्हणूनच याला जबाबदार असणाऱ्यांची संख्या किंवा यादी फार लांबलचक तयार होईल. पण, सरकारने त्याकडे गांभीर्यांने पाहिले तर हा मार्ग आपोआप समृद्ध आणि सुरक्षित होवू शकतो.
मुळात फेरीबोट किंवा इतर जल वाहतूक प्रवासी बोटी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरतात. यामध्ये प्रवश्यांना घरी परतण्याची घाई असतेच. त्यात प्रवासी बोटवाल्यांच्या नफेखोरीची हाव हा एक भाग.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेएनपीटी, ओएनजीसी न्हावे यांचे महाकाय जहाज गेली अनेक वर्षे त्या भागातून ये-जा करतात, काही वेळा समुद्रातच नांगरतात. काही वेळा तिकडे अपघात झाल्यानंतर सर्वच माल, कंटेनर समुद्रातून काढले जातात असेही होत नाही. तेव्हा गाळात ते रुतले जातात. काही अंशी तुटेलेल्या जहाजांचे अवशेषही त्यात असतात.
सर्वात महत्वाचा म्हणजे जेएनपीटीच्या तांत्रिक विभागाचे तिकडे बारीक लक्ष असणारी अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्यांच्या सर्व्हरवर जहाजांचे मार्ग आणि आराखडा असतो. तो संगणकावर दिसतो. तिकडे कामगार सतत लक्ष ठेवून असतात. परंतु त्यासाठी असणाऱ्या चॅनेलमध्ये आलेला गाळ काढला जात नाही अशीही माहिती उपलब्ध होत आहे हे धोकादायक आहे.
समुद्राच्या कुशीतील उपेक्षित राहिलेले बुचर आयलँड हे तेलाचे बेट आणि गाव घारापुरीपासून थोड्या अंतरावर आहे. त्यानंतर घारापुरी, जेएनपीटी, न्हावे ओएनजीसी ही महत्वाची चार बंदरे आहेत. केंद्र आणि राज्य सरकार हवे तेवढे लक्ष जेएनपीटी सोडले तर अन्य तीन महत्वाच्या बंदरावर देत नसल्याने सामुद्रिक मार्ग, त्यातील अडथळे दुर होवू शकत नाहीत. अर्थात अशा दृष्टीकोनातून तिकडे कुणी पाहत नाही.
घारापुरी हे गाव फक्त पांडवकालीन लेण्यांकरिता प्रसिद्ध आहे असे नाही. तर परदेशी पर्यटकांना ते आकर्षण आणि संशोधनाचा खजिना आहे. तिकडे आजही परदेशी पाहुणे घारापुरीच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत, जशी राधा श्रीकृष्णावर भालली होती, तेच निर्व्याज प्रेम त्या बेटावर आणि तेथील फणसाच्या गऱ्यासारखे असलेल्या ग्रामस्थांवर आहे. राज्य सरकारने तिकडे पर्यटनाची दालने विदेशीस्तरावर खुली केली असती तर घारापुरी हे वेगळ्या उंचीच्या शिखरावर गेलेले पर्यटनस्थळ आज विकसित झालेले दिसले असते. तेव्हा आपोआप हे जलमार्गसुद्धा अधिक सुरक्षित झाले असते.
कालच्या अपघाताला अनेक कंगोरे आहेत. ते इतक्यात समोर येणार नाहीत. त्यावर त्वरित अनुमान काढणेही चुकीचे ठरेल. आता फक्त नौदल आणि फेरीवाला बोट यांच्यातील आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. अजून मेरी टाईम बोर्ड, भाऊचा धक्कावरील प्रशासन, सागरी नौका नयन खाते, इतर संबंधित यंत्रणेचा सहभाग, जेएनपीटी बंदरातील जहाजांचे वेळापत्रक अशा कायदेशीर आणि तांत्रिक बाजू पुढे यायच्या आहेत. तेव्हा त्या सर्वांच्या अनुषंगाने कंगोरे तपासून बोलणे उचित ठरेल. तूर्तास, हा अपघात मानवी चुकांमुळे झाला आहे, तो टाळता येणे सहज शक्य झाले असते, इतक्या प्राथमिक निर्णयापर्यंत आपण पोहचू शकतो.
आता राहिला मुद्दा, अपघातानंतर काही जखमी प्रवश्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. त्यावरूनही अनेक बाबी, रुग्णालयांची क्षमता आणि वैद्यकीय अधिकारी, औषधोपचार याचा आढावा घेतल्यास नव्या वादाला फोडणी मिळू शकते. मात्र, राज्यात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर काही तासातच ही अपघाताची दुर्दैवी घटना घडल्याने राज्य सरकारलाही काही लपवाछपवी करावी लागणारच होती, तोही मुद्दा तितकाच महत्वाचा होता आणि म्हणूनच 13 जणांना जलसमाधी मिळाल्यानंतर प्राथमिक स्तरावर एकाचा बुडून मृत्यू झाला असे सांगावे लागले. बोट फुटली आणि काही क्षणातच ही दुर्घटना घडली. पण त्याची आकडेवारी मोजायला सरकारी यंत्रणेला सूर्य बुडण्याची वाट पाहावी लागली हे सुद्धा धान्यात घेण्यासारखं आहे.