माथाडी कामगारांना कोयत्याने मारहाण

0
231

वाकड, दि. ४ (पीसीबी) – सहा ते सात जणांच्या टोळक्याने तीन माथाडी कामगारांना कोयत्याने मारून जखमी केले. तसेच एका कामगाराच्या खिशातून दहा हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३) दुपारी वाकड येथील एका मॉलच्या गेटवर घडली.

लोकेश विनोद लखन (वय २७, रा. खडकी, पुणे), अनिल कांबळे, प्रवीण पारखी अशी मारहाण झालेल्या कामगारांची नावे आहेत. लोकेश यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा ते सात अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोकेश आणि त्यांचे सहकारी अनिल कांबळे, प्रवीण पारखी हे वाकड येथील एका मॉलच्या गेटवर थांबले होते. तिथे मास्क लावून आलेल्या सहा ते सात जणांनी मॉल परिसरात येऊन कोयत्याने टेबलवर मारले. दगडाने गार्ड केबिनची काच फोडली. सुरक्षा रक्षक राजकिशोर यास हाताने मारहाण केली. कामगारांना जीवे मारण्याची धमकी देत जेसीबीच्या काचा फोडल्या. अनिल आणि प्रवण यांच्या हातावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. अनिल यांच्या खिशातून दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून नेत दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.