माझी वसुंधरा अभियानामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल

0
212

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये अमृत गटात तसेच हरित आच्छादन आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात अव्वल ठरली आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे पार पडलेल्या समारंभामध्ये महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्विकारला. अमृत गटातील अव्वल क्रमांकासाठी ८ कोटी रुपये रोख व प्रमाणपत्र आणि जैवविविधता प्रकारात उच्चतम कामगिरीसाठी २ कोटी रुपये रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कार सोहळ्यास महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त रविकिरण घोडके, स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या समन्वयक सोनम देशमुख, पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता हरविंदरसिंग बन्सल, सेवानिवृत्त उद्यान अधिक्षक गोरख गोसावी आदी उपस्थित होते.

शहराचा सर्वांगीण विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने महानगरपालिका नेहमीच विविध उपक्रम राबवित आलेली आहे. यामध्ये नागरिक,लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध स्वयंसेवी संस्था तसेच महानगरपालिकेच्य विविध विभागांचा मोलाचा वाटा आहे. राज्याने पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली असून हा सन्मान खऱ्या अर्थाने शहरवासियांचा सन्मान आहे, अशी भावना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. शहर विकासाचे उद्दिष्ट साध्य करित असताना पर्यावरणपूरक जीवनमानावर भर देणे आवश्यक आहे. सामुहिक प्रयत्न आणि नागरी सहभागामुळे या औद्योगिक नगरीला हरित नगरी बनवणे शक्य होत होणार असून या शाश्वत निरंतर प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे असे आवाहनही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.

राज्यामध्ये १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये माझी वसुंधरा अभियान ३.० राबविण्यात आले. या अभियानामध्ये १ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या एकूण ४३ अमृत शहरांचा गट तयार करण्यात आला होता. यातील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे.

अभियानामध्ये अमृत शहरांसाठी विविध प्रकारात गुण निश्चित करण्यात आले होते. यामध्ये शहरातील हरित आच्छादित आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन व पुनरुज्जीवन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पर्यावरण पूरक मूर्तींचा प्रचार व वापर, सौर उर्जेचा वापर, बायोगॅसचा वापर, अभियानाचा प्रचार व प्रसार, पर्यावरण दूतची नियुक्ती,अभियानामधील नागरिकांचा सहभाग, माझी वसुंधरा १.० व २.० अंतर्गत जगवलेल्या वृक्षांची संख्या तसेच पूर्तता आदी बाबींचा समावेश होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला या प्रकारांत यशस्वी कामगिरी केली आहे.
नुकताच महानगरपालिकेला ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर या जागतिक स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी गतिमानता अभियानामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने तर शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरीबद्दलचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.