माजी आमदार बाळासाहेब दांगट पुन्हा शिवसेनेत

0
663

– पुणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार

पुणे, दि. २९ (पीसीबी) : माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितत शिवसेनेत प्रवेश केला. दांगट यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. ठाकरे कुटुंबांशी तीन पिढ्यांचे संबंध असलेले दांगट हे जुन्नर तालुक्यातून दोन वेळा शिवसेनेचे आमदार होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसला. त्यानंतर खुद्द ठाकरे यांनी जुन्या नेत्यांना पुन्हा साद घातली. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा प्रमुख असे अनेक जण बंडखोरांना सामील झाल्याने तालुक्यांत तर शिवसेनेला नेता मिळणे अवघड झाले आहे. त्यावर ठाकरे यांनी उपाय शोधून काढला आहे.

उद्धव ठाकरे यांना माजी आमदार बाळासाहेब दांगट यांची आठवण झाली. शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले दांगट हे पक्षातील कुरघोड्यांना कंटाळून राजकारणापासून दूर गेले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण तेथे ते फारसे सक्रिय नव्हते. तेच हेरून उद्धव ठाकरे यांनी दांगड यांना पुन्हा शिवसेनेते आणले आहे. त्यामुळे तालुक्यासह, पुणे जिल्ह्यातही शिवसेनेला ताकद मिळणार आहे.

दांगट कुटुंब आणि शिवसेना यांचे जुने नाते आहे. मुंबईत दबदबा टिकवून असललेले वृत्तपत्र एजंट बाजीराव दांगट आणि बाळासाहेब यांना शिवसेनेतील बंडखोरीबद्दल चीड असल्याने त्यांनी संभाजी तांबे यांच्याशी संपर्क साधला होता. जुने शिवसैनिक असल्याने त्यांनाही बंडखोरीबद्दल चीड निर्माण झाली होती. स्वतःच दांगट यांनी संभाजी तांबे यांच्यासाख्या जुन्नरच्या पदाधिकाऱ्यांसह संपर्क साधला होता. त्यांनी ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर बाजीराव दांगट यांनी ती भेट घडवून आणली होती, असे शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले होते.
जुन्नरमध्ये पुन्हा भगवा फडकविण्याची तयारी ठाकरे यांनी केल्यानंतर बाळासाहेब आणि बाजीराव दांगट हे दोन्ही बंधू `मातोश्री`वर गेले होते. शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचे दांगट यांनी मान्य केले होते. त्यानुसार जुन्नरमध्ये मोठा मेळावा होणार असल्याची माहिती देण्यात आली. दांगट यांच्या घरवापसीमुळे जुन्नरमध्ये तरी पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे.