मुंबई, दि. १३ (पीसीबी) – बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर पीठाने एक १३ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा जामीन मंजूर करते वेळी कोर्टातील न्यायधीशांनी हे कृत्य गुन्हा मानले नाही. हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलं की हा बलात्कार नाही तर दोघांमधील प्रेम संबंध होते. हे शाररिक संबंध वासनेतून नव्हे तर आकर्षणातून झाले होते. तसेच न्यायाधीशांनी आरोपीला जामीन दिल्यानंतर केलेल्या या टिप्पणीनंतरही वाद सुरू झाला आहे. अनेकांनी आरोपीला जामीन दिल्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके या म्हणाल्या की, मुलीने तिच्या निवेदनात म्हटलं आहे की तीने स्वतःच्या इच्छेने आपलं घर सोडलं होतं. ती आरोपीसोबत रहात होती, ज्याचं वय २६ वर्ष आहे. दोघांनी प्रेम संबंध स्वीकार केले होते. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी आदेशानुसार म्हटले की, ‘असे दिसते की लैंगिक संबंधाची कथित घटना दोन तरुणांमधील आकर्षणाबाहेर होती आणि असे नाही की अर्जदाराने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.’
पीडितेच्या वडिलांनी ऑगस्ट २०२० मध्ये पोलीस स्टेशनमध्ये आपली १३ वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. पोलीसांनी मुलीचा शोध सुरू केला, त्यानंतर मुलगी एका २६ वर्षीय तरुणासोबत सापडली होती. त्या मुलीने सांगितलं की, ती त्या तरुणावर प्रेम करते आणि ती त्याच्यासोबतच राहू इच्छिते. मात्र मुलीचे वय फक्त १३ वर्ष होतं म्हणून पोलीसांनी त्या तरुणाला अटक केली आणि मुलीला तीच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले.
‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नितीन विरुद्ध आयपीसीच्या कलम ३६३,३७६,३७६ (२) (एन), ३७६ (३) तसेच कलम ३४ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४,६ आणि १७ नुसार गुन्हा दाखल केला. अमरावती जिल्ह्यातील संबंधीत गावातील पोलिसांनी ३० ऑगस्ट २०२० रोजी अर्जकर्त्याला अटक करून कारागृहात पाठवले. २६ ऑक्टोबर २०२० रोजी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.
मुलीने तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध असून, त्याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावली नसल्याचे आपल्या जबाबात म्हटले आहे. खटल्यात कोणतीही प्रगती झालेली नाहीये आणि १३ वर्षांच्या मुलीच्या संमतीने काही फरक पडत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.