महाविकास आघाडीला भविष्यात आश्चर्यकारक धक्के बसणार, बॉम्बस्फोटही होतील

0
281

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आधीचे मुख्यमंत्री घराबाहेरच पडायला तयार नव्हते, त्यामुळे एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार लुटल्याची जहरी टीका बावनकुळे यांनी केली आहे. मविआमधील कार्यकर्त्यांमध्ये अजूनही असंतोषाची भावना आहे, अनेकांमध्ये अन्यायाची भावना आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

महाविकास आघाडीला भविष्यात आश्चर्यकारक धक्के बसणार आहेत, बॉम्बस्फोटही होतील असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडील राहिलेले कार्यकर्ते सुद्धा लवकरच भाजपात येतील, असे बावनकुळे म्हणाले. यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर टिका केल्यामुळे आता यावर राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वपूर्ण आहे. बावनकुळे यांचा नुकताच ६ सप्टेंबर रोजी बारामती दौरा झाला होता. आगामी बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचनेतून भाजप सक्रीय आहे. यामुळे बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगत जाण्याची शक्यता आहे.