- मंदिरांच्या प्रथा-परंपरा अखंडित ठेवण्यासाठी मंदिरांवर सरकारऐवजी भक्तांचेच नियंत्रण हवे !* – मंदिर विश्वस्त
रत्नागिरी, दि. ११ (पीसीबी) – मंदिरे ही सनातन धर्माची आधारशीला आहे, तसेच हिंदूंच्या संघटनाचे हे महत्वाचे केंद्र आहे; मात्र आज सरकारीकरणामुळे मंदिरांचे व्यवस्थापन मंदिर, धर्म, देवता यांविषयी काहीही न वाटणार्या व्यक्तींच्या हाती गेले आहे. सरकारीकरणामुळे हिंदूंच्या प्रथा, परंपरा खंडित होत आहेत. हे चित्र पालटण्यासाठी आणि मंदिरे भाविक-भक्त यांच्या नियंत्रणात हवीत, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात सर्व मंदिर विश्वस्तांनी केली. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रत्नागिरी येथील ‘श्रद्धा साफल्य मल्टीपर्पज हॉल’ मंदिर अधिवेशन संपन्न झाले. या वेळी जिल्ह्यातील संत, पुरोहित, पुजारी, मंदिर विश्वस्त, मंदिरांसाठी लढणारे अधिवक्ता, मंदिर प्रतिनिधी आदी ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते.
या वेळी खेड तालुका वारकरी संघटनेचे सचिव ह.भ.प. गणपत महाराज येसरे, श्री महाकाली देवस्थान आडिवरेचे श्री. स्वप्निल भिडे, कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिराचे श्री. रमाकांत ओळकर, श्री महादलिंग देवस्थान १५ गाव धामणंद खेडचे श्री. संतोष उतेकर, श्री शारदादेवी देवस्थान तुरंबव चिपळूणचे अध्यक्ष श्री. कृष्णा पंडित, नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ चिपळूणचे अध्यक्ष आणि सीए विवेक रेळेकर, पिरंदवणे येथील श्री सोमेश्वर सुंकाई इंडोव्हमेंट ट्रस्टचे श्री. सुनीत भावे, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण गुरव, संस्थान श्री देव गणपतीपुळेचे श्री. चैतन्य घनवटकर, श्री अखिल गुरव समाज संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. उमेश गुरव, श्री. दिनेश बापट, दापोली जालगावचे ग्रामदैवत श्री देव भैरीचे उपाध्यक्ष आणि महाकाली देवस्थानचे अध्यक्ष श्री. रमेश कडू, श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान राजीवडाचे अध्यक्ष श्री. प्रवीण वायंगणकर, श्री नवलाई पावणाई जाकादेवी महापुरुष मंदिराचे श्री. राजेंद्र सावंत आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कुठलेही एक मंदिर बंद होणे, म्हणजे ७ पिढ्यांचे भवितव्य बंद होणे ! – डिगंबर महाले, अध्यक्ष श्री मंगळग्रह संस्थान, अंमळनेर, जळगाव संस्था, संघटना कोणतीही असो, त्यातील पदाधिकारी, चालक यांच्या विचारात सुस्पष्टता हवी, तरच मंदिरांचे व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकते. पुजारी विश्वस्तांना मिळणारा मान हा केवळ त्यांचा नसून तो देवाचा आहे. देशात हिंदु समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात असूनही हिंदूंना मंदिर रक्षणासाठी विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी आता दबावतंत्रच अवलंबवावे लागेल. आपले कुठलेही एक मंदिर बंद होणे याचा अर्थ पुढील ७ पिढ्यांचे भवितव्य बंद होईल.
मंदिरांच्या व्यवहारात राजकारण नको, तर व्यवहार धर्मानुसार हवा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आज बर्याच मंदिरात मानपानावरून भांडणे होतात. मंदिर रक्षणासाठी स्वतःचे मानपान बाजूला ठेवायला हवेत. मंदिर सरकारच्या ताब्यात गेले, तर राजकीय मंडळी अन्य क्षेत्रात जे घोटाळे करतात तेच मंदिरातही चालू करतील. विश्वस्तांच्या आपापसांतील भांडणामुळे सरकारला मंदिरांचे सरकारीकरण करण्याची संधी मिळून आपली मंदिरे बंद पडत आहेत.
विश्वस्तानी न्यासाचे कारभार काळजीपूर्वक करावेत ! – दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त
भारतातील पहिला विश्वस्त म्हणजे भरत. भरत हा अयोध्येचा विश्वस्त होता. विश्वस्तांना विकासाचा अधिकार आहे; पण नुकसानीचा नाही. विश्वास्तांनी न्यासाचे कारभार काळजीपूर्वक करावेत. नियम, परंपरा, प्रचलित कायदे, निर्देश यांचे काटेकोर पालन करावे. स्वतःच्या पैशांची, मिळकतीची ज्याप्रमाणे काळजी घेतो तेवढीच मंदिरांच्या संपत्तीची काळजी घेणे आवश्यक आहे.
देशभरातील सर्वच मंदिरामधून जागृती झाल्यास देश विश्वगुरु बनायला वेळ लागणार नाही ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची स्थापना झाल्यावर विश्वभरात जागृती झाली, तर देशभरातील सर्वच मंदिरामधून जागृती झाल्यास देश विश्वगुरु बनायला वेळ लागणार नाही. मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी ५०० मीटरच्या परिसराच्या मद्यमांस बंदी झाली पाहिजे; परंतु गणपतीपुळे येथे श्री गणपती मंदिराच्या ३०० मीटर आवारातच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टोरंट आहे ते शासनाने बंद केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करत असूनही सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे अनुदान शासनाने तात्काळ वाढवावे. मंदिरांसाठी आपल्याला आज अधिवेशन घ्यावे लागते, हे दुर्दैव आहे. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जे भूमी बळकावण्याचे षड्यंत्र आहे, त्यासाठी वक्फ बोर्ड कायदाच रद्द केला पाहीजे.
कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता ! – अधिवक्ता अनुप जैस्वाल
कमीत कमी खर्चात, अल्प वेळेत मंदिराच्या भूमी परत घेणे या मुख्य उद्दिष्टानुसार आम्ही १२०० एकर भूमी परत घेतल्या. जेव्हा शासनाचा सातबारा अस्तित्वात नव्हता, तेव्हा मंदिरे अस्तित्वात होती. तरीही आज जर सातबारा पाहिल्यास सर्व मंदिरांच्या भूमीवर ‘शासन’ असे नमूद केले आहे. काही ठिकाणी ‘आम्हीच मालक आहोत’, असे महसूल विभागास भासवून स्वतःची मालकी लावली असेल, तर त्याविरुद्ध आपण धर्मादाय आयुक्तांकडे पाठपुरावा करू शकतो. कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
जन्महिंदूला कर्महिंदु बनवण्याचे कार्य मंदिराच्या माध्यमातून होते ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समाजाला एकसंघ ठेवण्याचे, जन्महिंदूपासून कर्महिंदु बनवण्याचे कार्य मंदिराच्या माध्यमातून होत असते. श्रद्धेने केलेली कृती लाभदायक ठरते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. धर्मशिक्षणाने मंदिर संस्कृती संवर्धन होण्यास साहाय्य होईल. ईश्वरी अधिष्ठान ठेवून कार्य केले, तर ईश्वराचे आशीर्वाद मिळाल्याने कार्य यशस्वी होते. आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी प्रतिदिन काळानुसार नामसाधना करणे आवश्यक आहे.
‘हर हर महादेव’च्या जय घोषात एकमताने ठराव संमत !
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत सरकारने सर्व मंदिर सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत. सरकारने मंदिरांची संपत्ती विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी. मंदिरांचा निधी धर्मकार्यासाठीच वापरला जावा. ‘क’ वर्गातील मंदिरे तात्काळ ‘ब’ वर्गात वर्गीकृत करावीत. मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी परिसरात मद्य-मांस विक्रीवर बंदी घालावी. सरकारने मंदिरांच्या पुजार्यांना प्रतिमाह मानधन देण्याची व्यवस्था करावी. मंदिरांवर झालेली सर्व प्रकारची अतिक्रमणे तात्काळ दूर करावीत. दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी आदी ठराव उपस्थित मंदिर विश्वस्तांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात एकमताने संमत केले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी उपस्थितांचे स्वागत, तर श्री. विनोद गादीकर यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश कोंडस्कर आणि अधिवक्ता (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी केले