- मधुकर भावे
‘महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताबदल घडवूनच दाखवतो…’ या शब्दात श्री. शरद पवारसाहेब यांनी महाराष्ट्राचे उद्याचे राजकीय चित्र स्पष्ट केलेले आहे. पवारसाहेब बोलतात ते शब्द वाऱ्यावरचे नसतात. लोकसभा निवडणुकीत त्यांचे काही जिव्हाळ्याचे लोक त्यांना सांगत होते की, ‘बारामतीत धोका होऊ शकेल’.. पण, बारामतीचे बारसे जेवलेले शरद पवारसाहेब शांतपणे ऐकून घेत होते. मतदारांवर त्यांचा विश्वास होता. त्या निवडणुकीत पवारसाहेबांचा शब्द अंतिम होता. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही ‘महाराष्ट्रात सत्ताबदल होणारच’ हे त्यांचे वाक्य उद्याच्या महाराष्ट्राचे बदलणारे भविष्य सांगणारे आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नाना पटोले, पृथ्वीराज बाबा, बाळासाहेब थोारत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी या दोन्ही पक्षांची मजबूत साथ आहे. किंबहुना ही ‘महाविकास आघाडी’ हीच आता एक मोठी राजकीय शक्ती झालेली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या घाणेरड्या राजकारणाचा मतदारांना कमालीचा तिटकारा आलेला होता. आणि विधानसभा निवडणुकीमध्येही तोच विषय महाराष्ट्रासाठी कायम आहे. ‘सत्ता-पैसा-धाकधपटशा’ हे सर्व प्रयोग होणार आहेत. अगदी पदवीधर मतदारसंघातसुद्धा पैसे वाटल्याचीच चर्चा आहे. परवा रोह्याहून एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला की, ‘अहो, पदवीधर मतदारसंघात एका मताला तीन हजार रुपये वाटत आहेत…’ त्याला धक्काच बसला… पदवीधरही पैसे घेतात? म्हणजे एकूणच या मतदारसंघातील राजकारणाचे डाव खरे नाहीत, असेच म्हणायला हवे… काँग्रेसचे उमेदवार, माझे मित्र रमेश कीर यांना फोन केला… रोह्याचा किस्सा सांगितला… ते ठाम होते… ते म्हणाले, ‘मी पैसे वाटणार नाही… मतदारांवर माझा विश्वास आहे.’ मी म्हटले, ‘शाब्बास पठठ्या… तू जिंकशीलच…’ पण हरलास तरी सत्व गमावले नाहीस, हाच तुझा विजय आहे…’
आता महाराष्ट्रातील मतदार निर्भय झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली ही फोडा-फोडीची कीड… आणि ‘पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो’, ही मस्ती या सर्वाच्या विरोधात पुन्हा एकदा मैदानात महाराष्ट्र उतरेल… एक गोष्ट पुन्हा सांगतो की, महाराष्ट्रातील भाजपामधील एकही नेता असा नाही जो भाजपाच्या एकट्याच्या जोरावर महाराष्ट्रात बहुमत मिळवून देवू शकतो. मोदी-शहा पुन्हा फिरले तरीसुद्धा एकटा भाजाप महाराष्ट्रात बहुमत मिळवू शकणे, शक्य नाही… यापूर्वीही नव्हते. फडणवीस तर तेवढे मोठे नेते कधीच नव्हते आणि आजही नाहीत… २०१४ ला ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना बहुमत मिळवता आले नाही. २०१४ ते २०१९ पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर १२२ आमदारांवरून भाजपा १०५ आमदारांवर आला. ते कतृत्त्व फडणवीसांचेच होते. ‘लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळवणार…’ ‘भाजपा चारसौ पार होणार…’ याही घोषणा त्यांच्याच होत्या. महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला होता… एवढा पिंजून काढलेल्या सगळ्या महाराष्ट्राचा कापूस कोणत्या वाऱ्यावर उडून गेला, त्याचा पत्ताही त्यांना लागला नाही. सगळे हवेत राहिले. बावनकुळे सांगत होते, ‘४८ जागा जिंकणार…’ आताही सांगतील… ‘आम्ही २८८ जागा जिंकणार’ या सगळ्यामध्ये सर्वात जिरली ती फडणवीस यांची… बरोबर २० दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक निकाल लागल्यावर भाजपाच्या कार्यालयात फडणवीसांनी एक शोकसभा घेतली. त्याच सभेत पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.. ‘उपमुख्यमंत्रीपद सोडतो’, अशी घोषणा केली. लगेच त्याला प्रसिद्धी मिळाली. सर्वच वृत्तपत्रांनी हेडलाईन केली. ‘फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडणार’ अध्यक्षपद स्वीकारून महाराष्ट्र पिंजून काढणार… त्या घोषणेनंतर याच जागेवर लिहिलेल्या लेखात ‘फडणवीस राजीनामा देणार नाहीत, तू मारल्यासारखे कर… मी रडल्यासारखे करतो,’ असे स्पष्ट लिहिले होते. उपमुख्यमंत्री पद सोडण्याकरिता त्यांना मोदी-अमित शहा यांची परवानगी हवी होती. ही परवानगी ते देणार नाहीत, हे माहिती असल्यामुळेच ‘उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा’ त्यांनी केली. परवानगी नाकारल्यावर दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांत पुन्हा हेडलाईन आली… ‘उपमुख्यमंत्रीपदी फडणवीस कायम…’ ती हेडलाईन वाचून तर खूप करमणूक झाली. जणू काही ‘परमनंट’ नसलेल्या फडणवीसांना मोदी-शहा यांनी आता ‘परमनंट’ करून टाकले. ‘कायम’चा अर्थ ‘परमनंट’ असाच आहे…. त्याप्रमाणे फडणवीसांचे ते भाषण नेहमीप्रमाणे उघडे पडले. ‘पराभवाची जबाबदारी’ घ्यायला ते पुढे आले. पण, ‘प्रायशि्चत्त’ घ्यायला विसरले. जर पराभवाची जबाबदारी स्वीकारली तर प्रायश्चित्तही घ्यायला हवे. पण, मोदी-शहा साहेबांनी सांगितले, ‘असे काही करू नका… तुम्ही उपमुख्यमंत्रीपद सोडलेत तर महाराष्ट्रात आमचा विश्वासार्ह माणूस दुसरा कोण? आणि उद्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तर, पराभवाची जबाबदारी घ्यायला दुसरा कोण असणार? तुमच्याशिवाय एवढा विश्वासू माणूस आमच्याकडे नाही… महाराष्ट्रातील एवढी मोठी तोड-फोड तुमच्या मदतीमुळेच आम्ही करू शकलो…’ अगदी उघडपणे असे सांगणारे निघाले की, ‘आम्ही काय करणार? आमच्याकडे दोनच पर्याय होते… एकतर पक्षबदल करा…. नाहीतर तुरुंगात जा….’ मग हे सगळे महाभारत ज्यांनी घडवले त्यांचा राजीनामा कसा स्वीकारला जाईल..? फडणवीसांना हे माहित होते… पण, ज्या जोरात फडणवीस वावरत होते आणि विरोधकांची टिंगल करत होते त्या त्यांच्या विदर्भात तरी फडणवीसांच्या नेतृत्त्वाला कोणी हिंग लावून विचारले नाही. इकडे दादांच्या उमेदवारांचे काय झाले, हेही सगळ्यांना माहिती पडले. खुद्द फडणवीसांच्या नागपूरमध्ये गडकरीसाहेब निवडून आले ते भाजपाचे म्हणून नव्हे… ‘गडकरी’ म्हणून निवडून आले. फडणवीससाहेब तुम्ही स्वत: जर नागपुरात उभे राहिला असतात तर लाख मतांनी पडला असतात. नितीन गडकरी यांच्याबद्दल सर्व विदर्भाला आदर आहे. भाजपाच्या नेत्यांना चार शब्द सुनवायला ते कमी करत नाहीत. आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनात किंवा मोदी-शहा यांच्या मनात ‘गडकरींबद्दल प्रेम आहे,’ असे कोणी मानतही नाही. तसे असते तर दहा वर्षांत गडकरी यांच्याकडील चार खात्यांतील तीन खाती मोदीसाहेबांनीच काढून घेतली ना? भाजपाच्या कोअर कमिटीतून त्यांना वगळले कोणी? सामान्य मतदाराला हा सगळा तपशील पूर्ण माहीत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वोत्तम काम गडकरी यांनी केले. हेही महाराष्ट्र, अख्खा देश जाणतो. खुद्द फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघात फडणवीससाहेब, तुम्ही गडकरी यांना फक्त २६ हजारांचाच लीड दिलात. २०१९ साली तुम्ही ५४ हजार मतांच्या फरकाने निवडून आला होतात. काँग्रेसचे आशिष देशमुख तुमच्या विरुद्ध होते.. मग तुम्ही काय केलेत? तुमच्या विरोधात असलेल्या आशिष देशमुखांना भाजपामध्ये घेवून टाकलेत… तुमच्याकडे वॉशिंग मशीन तयारच आहेत. तुम्हाला वाटते, आता तुम्हाला विरोध संपला… व्यक्तीवर विराेध अवंबून नसतो. एकाची जागा दुसरा घेतोच… तसा दुसरा तयार आहेच… म्हणून तर तुमचे महाराष्ट्रात टाके ढिले झाले. तेव्हा आता विधानसभा जवळच अालेली आहे. त्या निवडणुकीतही महाराष्ट्रात काय होणार? हे पवारसाहेबांनी सांगूनच टाकलेले आहे. आजही सामान्य माणसे त्यांच्या प्रश्नांनी हैराण आहेत… निवडणूक झाल्यावर तुमचे बावनकुळे आणि नेतेमंडळी विधानसभा मतदारसंघात जमवा-जमव करण्यासाठी बाहेर पडली त्यावेळी शरद पवारसाहेब १० खेड्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. नेतृत्त्वाचा हा फरक आहे. महाराष्ट्र तुम्हाला समजलेला नाही. दादांनाही समजलेला नाही. पवारसाहेबांच्या पुण्याईवर आजपर्यंत सर्वकाही ढकलता आले. पुढचे दिवस अशा तोडफोडवाल्यांना महाराष्ट्रात सोपे नाहीत. पैसा-सरकार-तोडफोड, सर्वकाही असले तरी मतदार सर्वांना पुरून उरेल… त्याचा अनुभव पुन्हा एकदा येईल…
आता विधानसभा निवडणुकीत मोदी-शहा यांच्या सभा होतील, अशी शक्यता नाही. भाजपाजवळ वक्ताच नाही. आणि आदर असलेला नेताच नाही. सत्तेवर असलेले जे लोक आहेत ते नेते आहेत, असे कृपाकरून समजू नका… ज्या दिवशी फडणवीससाहेब सत्तेत नसतील त्यादिवशी फडणवीस साहेब, तुमचे नेतृत्त्व नेमके किती मोठे, याचे मोज-माप होईल. शासकीय फौज-फाटा घेवून मिरवले म्हणजे ‘नेता’ नसतो. महाराष्ट्राने हे दाखवून दिले आहे. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील सरकार तुमच्या सोबत असले तरी, मतदार तुमच्या सोबत नाही. दादांना जेव्हा ‘घड्याळ’ निशाणी मिळाली तेव्हाही मी हेच लिहिले होते… ‘दादा, सगळी दानं तुमच्या पदरात पडली तरी… ‘मतदान’ तुमच्या पदरात पडणार नाही…’ मतदारांनी शब्द न शब्द खरा ठरवला. आताही तेच होणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हे आता महत्त्वाचे राहिलेले नाही. महाराष्ट्राचे नासवलेले राजकारण पूर्ववत स्वच्छ केल्याशिवाय मतदार आता थांबणार नाहीत. काही वाचक विचारतात… ‘अहो, पूर्वी फूट झाली नव्हती का…? पवारसाहेबांच्या काळात…’ झाली होती ना… नाही कोण म्हणतो… तेव्हाही काय लिहिले होते ते त्यावेळचे अंक बघा… पण त्यावेळी फुटलेल्या कोणीही ‘माझ्यासमोर दोनच पर्याय होते… एक पक्षबदल नाही तर तुरुंग…’ असे म्हटले होते का? मग फाटा-फुटीचा जुनाच दाखला द्यायचा तर… रामायण काळात रावणाची पार्टी सोडून बिभिषण महाराज फुटले, तिथपर्यंत मागे जावे लागेल… आणि फुटलेल्या बिभिषण महाराजांना रामरायाने लंकेचे अख्खे राज्य देवून टाकले. त्या इतिहासापर्यंत पोहोचावे लागेल… दोन प्रसंग… घटना… संदर्भ… वेगवेगळे आहेत… म्हणून परिणाम वेगळे आहेत… सामान्य मतदाराला यातील फरक कळत नाही, असे समजता येईल का? ‘महाराष्ट्र नासवला,’ असे त्यावेळी कोणी म्हणत नव्हते… हा फरक समजून घ्या…
तर आता लोकसभेची लढाई अर्धी जिंकली. राहिलेली अर्धी लढाई जास्त महत्त्वाची आहे. कारण या महाराष्ट्राला ओरबाडण्याचे काम केंद्र सरकारकडून होत आहे. मुंबईला लुबाडण्याचे काम होत आहे. मराठी माणसाला नामशेष करण्याचे काम होत आहे. मुंबई शहरात हा सगळा संताप शिगोशीग भरून राहिलेला आहे. म्हणून तर, पाच जागांवर दणका मिळाला. अाताही मराठी माणूस जात-भेद विसरून पुन्हा एकदा यशवंतरावांचा महाराष्ट्र आणि तो सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. यात व्यक्तिगत कुणाबद्दलही टीकेचा भाग नाही. या महाराष्ट्रात सद्भावनेने निवडणुका होत होत्या. स्वत:चे छकडे, घरची चटणी-भाकर घेवून कार्यकर्ते प्रचाराला बाहेर पडत होते. शिवसेनेतसुद्धा वडा-पाव खावून शिवसैनिक निवडणुकीचे काम करत होते. गेल्या काही वर्षांत ज्या सवई लावल्या गेल्या त्या अतिशय घाणेरड्या आहेत. त्यात काही प्रमाणात सर्व राजकीय पक्षांचा सहभाग होतो, पण तो मर्यादित होता… आता पैशाचा वारेमाप वापर खुलेआम चर्चेचा विषय आहे. पुढच्या पिढ्यांना आम्ही हेच आदर्श समोर ठेवणार आहोत का? सेवा आणि समर्पण या शब्दांना तिलांजली दिलेले राजकीय पक्ष तो महाराष्ट्र पुन्हा उभा करू शकणार नाहीत. आणि म्हणून तुमच्या या सगळ्या घाणेरड्या राजकारणाला विरोध आहे. ज्याच्यावर आरोप झाले, तो तुमच्या पक्षात आला की, शुद्ध झाला… ‘पार्टी वीथ डिफरन्स’वाले तुम्ही आता राहिला नाहीत. ते वसंतकुमार पंडीत होते…. उत्तमराव पाटील होते. रामभाऊ म्हाळगी हाेते. राम कापसे होते… राम नाईक अजूनही आहेत… नितीन गडकरी आहेत… या सर्व सुसंस्कृत नेत्यांच्या बरोबर उभा राहू शकेल, या चारित्र्याचा एकही नेता तुमच्यासोबत आज नाही. निवडणुकीतील विजय-पराजय महत्त्वाचा नाही. निवडणुकीने कोणते वळण घेतले आहे, ही महत्त्वाची चर्चा आहे. आणि हे वळण अतिशय घाणेरडे आहे. पुढच्या पिढीला आपण हेच सांगणार आहोत का? धटींगणपणाच्या हातात राज्य गेले तर वाळुमाफीयावाले, होर्डींगमाफीयावाले यांचीच निपज होणार… पैशाच्या जोरावर सगळेच बेकायदा काम करता येते, अशी भावना तयार झालेली आहे. नाहीतर पुण्याच्या ससूनमध्ये रक्ताचे नमूने कचराकुंडीत टाकण्याची हिम्मत होणे याचाच अर्थ प्रशासन नासणे… आणि हे नासलेले प्रशासन किंवा नासलेले सरकार आणि नासलेली यंत्रणा हीच महाराष्ट्राची आजची चिंता आहे. महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे तुमचे लक्ष आहे का? २४९ नद्यांचे पाणी विषारी झालेले आहे. गुरेही हे पाणी पिऊ शकणार नाहीत… शेतीसाठी बांधलेल्या धरणांपैकी किती धरणांचे पाणी शेतीला पुरवले जाते? २०१४ पासून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात आहात. पाच वर्षे मुख्यमंत्री होतात. एक तरी नवीन औष्णिक ऊर्जा केंद्राचा प्रस्ताव तुम्ही आणलात का? ‘उजनी’सारखे एकतरी महाकाय धरण तुम्ही बांधले का? ‘काँग्रेसने काय केले’, असे म्हणायला फार सोपे आहे…. पण, तुम्ही काय केलेत? महाराष्ट्राचे सगळे राजकारण नासवलेत? हेच तुमच्या नावावर इतिहासात लिहिले जाणार… आणि म्हणून अर्धी लढाई झाली… विधानसभेची लढाई अजून बाकी आहे… आणि लोकसभा निवडणुकीपेक्षा ती महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाची आहे. पवारसाहेबांना नेमके हे सूत्र समजलेले आहे… म्हणून तर ते ठामपणे सांगून गेले, ‘राज्य हातात कसे येत नाही, ते पाहूया…’ पुरोगामी महाराष्ट्रासमोर हाच प्रश्न आहे… पुन्हा त्याच लोकांना जवळ करायचे की, महाराष्ट्र शुद्ध करण्यासाठी….. पुन्हा अंगठ्याजवळचे बोट पुरोगामी चिन्हांवर दाबायचे… महाराष्ट्रातील शहाणा मतदार याचा नेमका निर्णय करणार… त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला तरी… ते पिंजणे व्यर्थ ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून झालाच होता ना? मग ४८ चे ११ वर कसे काय आलात?
आता केवळ मतदारांनाच नव्हे…. भाजपामध्ये गेलेल्या विविध पक्षातील नेत्यांनाही कळून चुकले आहे.. ‘आपले चुकले…’ ‘चुकीच्या पक्षात आलो होतो’… त्याची सुरुवात झाली आहे…. श्रीमती सुर्यकांता पाटील यांनी भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला… रावसाहेब दानवे नांदेडच्या पराभवाचा आढावा घ्यायला गेले होते… म्हणजे किती विनोद आहे पहा… इकडे जालन्यात दानवेसाहेब स्वत: पडले… आणि पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली नांदेडच्या पराभवाचा आढावा घ्या… रेल्वे राज्यमंत्रीपद गमावलेले…. दानवे मोटारीने नांदेडला पोहोचले… कार्यकर्त्यांनीच त्यांचे प्रथम सांत्त्वन केले… मग दानवे यांनी नांदेडच्या कार्यकर्त्यांचे सांत्त्वन केले…. मग हा ‘सांत्त्वन कार्यक्रम’ आटोपल्यावर दानवे लातूरच्या सांत्त्वनासाठी रवाना झाले. आणि त्यांची पाठ फिरते ना फिरते तोच सूर्यकांता पाटील यांनी भाजपाचा राजीनामा दिला… जे गेले ते असेच परत येणार आहेत… एकदा दादांचा अर्थसंकल्प होऊन जाऊ द्या… सत्ताधारी आमदारांना एकदा का निधीचे वाटप झाले की, मग पोळा फुटणार…. परवा एक आमदार सांगत होते… ‘अहो, नाईलाज आहे… पवारसाहेबांची भूमिका मान्य आहे… आम्ही त्यांच्यासोबतच आहोत…. ते आले की, आमच्याच घरी जेवायला येतात… एकदा दादांच्या अर्थसंकल्पातून निधी मिळाला की मग आम्ही पवारसाहेबांचेच… तत्त्वबरोबरच आहे… पण, आजच्या राजकारणात व्यवहार पण पाळायला हवा ना….’
मानले त्या नेत्याला…
असा एक नाही… अनेक आहेत…
सध्या एवढेच…