महायुतीचे नऊ बडे नेते शरद पवारांच्या गळाला

0
98

मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रशांत परिचारक, मदन भोसले, समरजीत घाटगेंची नावे

पिंपरी, दि. २७(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीच्या नाराज बड्या नेत्यांना हेरून मोठा गेम प्लॅन केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल नऊ जाणकार, प्रभावी नेत्यांना गळ टाकला आणि ते सगळेच्या सगळे शरद पवार यांच्या मागे जायला तयार झाले आहेत.


लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतात . अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील , पंढरपूरचे प्रशांत परिचारक , इंदापूरचे हर्षवर्धन पाटील , पुण्यातील बापू पाठारे , भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.


एकनाथ शिंदेंसोबत अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन केलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल, या अपेक्षेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील महायुतीत सामील करून घेतले . वर्षानुवर्षे कट्टर विरोधक राहिलेल्या नेत्यांची अनेक मतदारसंघात लोकसभेसाठी मोट बांधण्यात आली . पण आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज नेते पुन्हा महविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत . कागलच्या समरजित घाटगे यांनी मोकळ्या करून दिलेल्या या वाटेने येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक बड्या नेत्यांचा परतीचा प्रवास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


कोणते नेते शरद पवार गटात सामील होऊ शकतात?
* भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढवू शकतात . चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचाराची पडद्याआडडून धुरा सांभाळलेले रणजितसिंह आता उघडपणे भाजपला सोडचिट्ठी देऊ शकतात .


* माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील सातत्यानं शरद पवारांच्या भेटी घेत असून स्वतःच्या मुलाला तुतारीवरून लढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत . आता शिंदे की मोहिते याचा निर्णय शरद पवार ऐनवेळी घेण्याची शक्यता आहे.


* शेजारच्या पंढरपूरचे प्रशांत परिचारक विधानपरिषदेचे आमदार म्हणून गेली सहा वर्षं भाजपसोबत होते पण येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते हातात तुतारी घेऊ शकतात .


* तर शेजारच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या शहाजीबापू पाटील यांची उमेदवारी महायुतीकडून पक्की मानली जात असल्यान ऐन लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले अभिजित पाटील पुन्हा शरद पवारांकडे परतून हातात तुतारी घेऊ शकतात . त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक साळुंखे हे देखील सांगोल्यातून लढण्यासाठी तुतारी हातात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत .

* सातारा जिल्ह्यातील वाई – खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांची त्यांच्या घरी जाऊन जयंत पाटलांनी शनिवारी भेट घेतली . त्यामुळं तेदेखील मकरंद पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी हातात तुतारी घेऊ शकतात .


* शेजारच्या फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठींब्यावर निवडणून आलेले आमदार दीपक चव्हाण हे नावापुरतेच महायुतीसोबत असल्यानं ते देखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत .


* पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्यानं गेली काही वर्ष भाजपसोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत . हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत .


* पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि गेली काही वर्ष भाजपसोबत असलेल्या बापू पठारेंची जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली . त्यामुळं अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारेंची उमेदवारी नक्की मानली जातेय .


* कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधून समारजीत घाटगेंनी भाजपची साथ सोडत तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत . शेजारच्या राधानगरी – भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईंनी नुकताच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा त्यासाठी राजीनामा दिला होता.


सत्तेसोबत घरोब्याची गरज संपताच नेत्यांची माघारी फिरण्याची तयारी
हे नेते त्यांच्या पक्षांतराबद्दल सध्या मौन बाळगून आहेत . योग्य वेळेची ते वाट पाहतायत . पण त्यांचे कार्यकर्ते उघडपणे आपल्या नेत्याच्या राजकारणाची येणाऱ्या काळातील दिशा कोणती असेल याचे संकेत देताना दिसत आहेत. त्यातील अनेकांचे साखर कारखाने , पतसंस्था , शिक्षण संस्था आणि इतर उद्योग आहेत . त्यासाठी सत्तेसोबत घरोबा करणं ही त्यांची राजकीय गरज राहिलीय . त्यामुळे भाजपचा सत्ताकाळ ओळखून या नेत्यांनी 2014 पासून भाजपसोबत घरोबा केला होता . पण लोकसभेला लागलेले निकाल आणि महायुतीतील तीन पक्षांमधील गर्दीमुळे हे नेते बाहेर पडण्याचा पडण्याच्या तयारीत आहेत . या नेत्यांची राजकीय ताकद लक्षात घेता त्यांची ही घरवापसी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.


राजकारण हे संगीत खुर्चीसारखं असतं . एकजण पक्ष सोडून गेला की रिकाम्या झालेल्या जागेवर त्याच्या स्थानिक विरोधकाला बळ दिलं जातं . लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये इन्कमिंगमुळे झालेल्या गर्दीमुळे अनेक जागा रिकाम्या झाल्या . यातील बहुतांशजन पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहिलेत आणि आपल्या संस्था टिकवण्यासाठी दहा वर्षं भाजपसोबत घरोबा करून राहिलेत . पण आता महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं आपल्यावर अन्याय होत असल्याचे कारण देत घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत