महापालिका वायसीएम रुग्णालयात 206 कर्मचाऱ्यांची नेमणूक

0
274

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने बाह्यस्त्रोतांद्वारे विविध पदांवरील अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार, बीव्हीजी इंडिया यांच्यामार्फत तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील एकूण 206 कर्मचाऱ्यांची बाह्यस्त्रोतांद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या पगारावर मासिक 55 लाख 39 हजार रुपये खर्च होणार आहे.

संत तुकारामनगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय आहे. या रुग्णालयासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसह परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाईसेवक, फार्मासिस्ट अशा विविध पदांची गरज असते. महापालिकेत या पदांवर काही कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत. तर, काही कर्मचारी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी स्वरूपात मानधनावर घेतले जातात. मात्र, रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने नोंदणीकृत संस्थेमार्फत विविध पदांवरील अधिकारी, कर्मचारी बाह्यस्त्रोतांद्वारे उपलब्ध करून घेण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. तथापि, वायसीएम रुग्णालयाकरिता बीव्हीजी इंडिया लिमिटेड ही संस्था अनुबंधित केली आहे. या संस्थेला 1 ऑक्टोबर 2021 रोजी मनुष्यबळ पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.

ही संस्था ज्या कालावधीपर्यंत मनुष्यबळ पुरवठा करण्यास पात्र आहे, त्या श्रेणीतील पदे नेमणूक करण्यात येणार आहेत. त्यामध्ये तृतीय श्रेणीतील कनिष्ठ कारकून 18 पदे, स्टाफ नर्स 24 पदे, संगणक ऑपरेटर सहा पदे तसेच दूरध्वनी चालक, आहारतज्ज्ञ, दंत मेकॅनिक, श्रवणमापक तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, ईईजी तंत्रज्ञ, भूलशास्त्र तंत्रज्ञ, सीएसएसडी तंत्रज्ञ, ऑपरेशन थियटर सहायक, ऑपरेशन थियटर तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, ऑप्थेमेट्रीट अशी एकूण 99 पदे भरण्यात येणार आहेत. तसेच, चतुर्थ श्रेणीतील ब्लड बँक परिचर, प्रयोगशाळा परिचर, मजूर, आणीबाणी प्रभाग सेवक, शिपाई, ड्रेसर, क्ष-किरण परिचर अशी 107 पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील एकूण 206 कर्मचाऱ्यांची बाह्यस्त्रोतांद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे.