महापालिका च-होलीत उभारणार चार्जिंग स्टेशन; 7 कोटींचा खर्च

0
333

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील चऱ्होली येथील अॅमॅनिटी स्पेस येथे इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बस चार्जिंगसाठी ईव्ही चार्जिंग उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी उच्चदाब वीजपुरवठ्याशी संबंधित अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. याकामी 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महानगरपालिकेच्या गट ब आणि क संवर्गाच्या ऑनलाईन भरतीचे सर्व टप्प्यांचे कामकाज खासगी कंपनीला देण्यात आले. गट ब आणि क संवर्गातील एकूण 16 अभिनामाचे पदनामांची एकूण 386 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. महापालिकेच्या गट ब आणि क संवर्गाच्या ऑनलाईन भरतीचे सर्व टप्प्यांचे कामकाज टी.सी.एस. कंपनीस देण्यास व सदर जाहिरातीनुसार ऑनलाईन प्राप्त होणारे उमेदवारांचे अर्जानुसार प्रती उमेदवार 570 रुपये आणि शासन नियमानुसार देय जीएसटी तसेच होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

महापालिकेच्या क्रीडा विभागास आवश्यक विविध इनडोअर जीम साहित्य पुरवठा करून बसवून देण्यात येणार आहे. या साहित्य खरेदीकामी 5 कोटी 60 लाख रुपये खर्च होणार आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पोस्ट ग्रॅज्युवेशन संस्थेच्या नेत्ररोग विभागासाठी आवश्यक उपकरणे खरेदीकामी 55 लाख रुपये खर्च होणार आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी आवश्यक सर्जिकल साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. या साहित्य खरेदीकामी येणाऱ्या 11 कोटी रुपये खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. तसेच तरतूद वर्गीकरणाच्या विषयांसह इतर विविध विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. त्यास देखील प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.